नंदुरबार : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुड्या मका भिल-चित्ते असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेची संक्षिप्त हकीकत अशी, नंदुरबार तालुक्यातील १५ वर्षीय मुलीला शेळ्या चारत असतांना मुलीच्याच गावातील रिक्षा चालकाने रिक्षात बसवून प्रकाशा पुलाकडील एका झोपडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले होते. या प्रकरणी मुलीने घरी ही बाब सांगितल्यावर मुलीच्या फिर्यादीवरून नंदुरबार तालुका पोलिसात पोक्सो व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तालुका पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी तपास करून वेळेत आरोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.
न्या. के.आर. पेठकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सबळ पुरावे व साक्षी पाहता न्या. पेठकर यांनी आरोपी गुड्या मका भिल याला दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. व्ही.सी. चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे, हवालदार नितीन साबळे, पंकज बिरारे, शैलेंद्र जाधव यांनी काम पाहिले.
दोघा चालकांवर गुन्हा दाखल
नंदुरबार : अक्कलकुवा येथे रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याने दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा येथील मोलगी रस्त्यावर पुनजी रामा वसावे, रा.डाब याने त्याचे चारचाकी वाहन तर वसंत बिरजी पाडवी, रा. देवमोगरा पुनर्वसन याने त्याचेही चारचाकी वाहन रस्त्यावर उभे करून रहदारीस अडथळा आणला. याबाबत हवालदार अमरसिंग पाडवी व आकाश तिरकाडे यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.