जळगाव : जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडेल आणि शेतीचा हंगाम चांगला राहील, अशी शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी भादली बुद्रुक शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात ते बोलत होते. चर्चासत्राला आयोजक योगेश झांबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद चौधरी, किरण रडे, सरपंच मनोज चौधरी आणि माजी सरपंच विजय नारखेडे यांच्यासह इतर पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर चौधरी यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन गोपाल ढाके यांनी केले.
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी जळगाव जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस पडेल आणि शेतीत भरभराट होईल, अशी आशा व्यक्त केली. जिल्हा संसाधन अधिकारी समाधान पाटील यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि कृषी संलग्न व्यवसायांविषयी सखोल माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना केवळ शेतीपुरते मर्यादित न राहता स्वतःचे छोटे उद्योग सुरू करण्याची संधी मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मान्सून तळकोकणानंतर लवकरच व्यापणार उर्वरित महाराष्ट्र
मुंबई : शेतकऱ्यांसह सर्व नागरिक चातकाप्रमाणे ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो सर्वांना हवाहवासा वाटणारा, धरणीमायला तृप्त करणारा, तप्त वैशाखच्या उष्णतेपासून सुटका करणारा, पशु-पक्ष्यांची तहान मिटविणारा मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. सध्या त्याचा मुक्काम तळकोकणात आहे. पुढील काही दिवसांमध्ये तो उर्वरित महाराष्ट्रात मुक्कामाला निघणार आहे. मान्सूनच्या आगमनाची शुभवार्ता हवामान खात्याने दिली आहे.
एरवी ७ जूननंतर येणारा मान्सून यावर्षी केरळमध्ये आठ दिवस आधीच दाखल झाला आहे. रविवारी तळकोकण गाठल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत तो मुंबईत येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांत पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.