---Advertisement---
कराची-क्वेट्टा महामार्गावर लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. या घटनेत ३२ पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर डझनभर जखमी झाले. दहशतवाद्यांनी एका कारमध्ये स्फोटके ठेवली होती. पाकिस्तानी लष्कराचा ताफा जात असताना कारचा स्फोट झाला यात सैन्याच्या तीन वाहनांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या.
एका पोलिस अधिकाऱ्याने स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले की, कराची-क्वेट्टा महामार्गालगत एक कार उभी होती. रविवारी सकाळी लष्कराचा ताफा तेथून जात असताना त्याचा स्फोट झाला. ताफ्यात आठ लष्करी वाहने होती, ज्यापैकी तीन वाहने बेचिराख झाली. ज्यामध्ये लष्करी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना घेऊन जाणाऱ्या बसचाही समावेश होता.
---Advertisement---
लष्कराच्या जवानांनी तातडीने जखमींना कराची येथील रुग्णालयात पोहोचविले असता ३२ जवानांना मृत घोषित करण्यात आले, तर उर्वरित १२ पेक्षा अधिक जणांवर उपचार सुरू करण्यात आले. अद्याप हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतली नाही. या घटनेनंतर लष्कराच्या जवानांनी शोधमोहिम सुरू केली आहे.
यापूर्वी २१ मे रोजी याच महामार्गावर एका शालेय बसवर हत्ता झाला होता. यात पाच शाळकरी मुलांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते. सातत्याने होणान्या अतिरेकी घटनांमुळे पाकिस्तानातील सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. दहशतवाद्यांना आश्रय देण्याची किंमत आता संपूर्ण पाकिस्तानला मोजावी लागत आहे.