भारतातील प्रसिद्ध आणि जागतिक वारसा असलेला ताजमहाल लवकरच अधिक सुरक्षित होणार आहे. ताजमहालच्या सुरक्षेत आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार असून, येथे लवकरच अँटी ड्रोन प्रणाली बसवली जाणार आहे. अशी माहिती ताजमहाल सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सय्यद आरिब अहमद यांनी दिली.
आहे. सध्या ताजमहाल परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात् सीआयएसएफ आणि उत्तर प्रदेश पोलिस यांच्याकडून सुरक्षा दिली जाते. मात्र, आता हवाई धोके टाळण्यासाठी आणि ड्रोनद्वारे होणाऱ्या संभाव्य हल्ल्यांना रोखण्यासाठी अँटी-ड्रोन प्रणाली बसवली जाणार आहे. अहमद यांनी सांगितले की, ताजमहालच्या मुख्य घुमटाभोवती सुमारे २०० मीटरच्या परिघात प्रभावी असलेली ही अँटीड्रोन प्रणाली सुमारे ७ ते ८ किमीपर्यंत ड्रोनचे अस्तित्व ओळखू शकेल.
ही प्रणाली ड्रोनचे सिग्नल जॅम करून त्याला निष्क्रिय करेल. पोलिस कर्मचाऱ्यांना या प्रणालीच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी विशेष प्रतिसाद पथक तयार केले जात आहे. हे पथक ड्रोन कोठून उडवले गेले याचा मागोवा घेऊन त्या जागेची सुरक्षा सुनिश्चित करेल.
दरवर्षी येतात कोट्यवधी पर्यटक
अहमद यांनी यासंदर्भात सांगितले की, पुढील काही दिवसांत ही प्रणाली ताजमहाल परिसरात पूर्णतः कार्यान्वित होईल. ताजमहल ही भारताची सांस्कृतिक ओळख आहे. त्यामुळेच त्याच्या सुरक्षेला प्राधान्य आहे. जगभरातून दरवर्षी एक कोटींपेक्षा अधिक पर्यटक येथे येतात. ऑक्टोबर ते मार्च या हंगामात पर्यटकांची संख्या वाढते. पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने दररोज ४०,००० पर्यटकांची मर्यादा निश्चित केली आहे.