---Advertisement---
Jalgaon News: खासगी संस्थांना कर्ज देता येत नाही असा कुठेही कायदा नाही. कायद्याचे उल्लंघन न करता केवळ त्यांना लवचिक करून जिल्हा बँकांना खासगी संस्थांना कर्ज देता येणे शक्य असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरूवारी जिल्हा बँकेत झालेल्या सत्कारप्रसंगी दिली.
सहकार मंत्री बाबासाहब पाटील गुरूवारी जिल्हा दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली. याप्रसंगी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने चेअरमन संजय पवार, व्हा. चेअरमन अमोल पाटील यांच्या हस्ते ना. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथराव खडसे, माजी आमदार चिमणराव पाटील, ॲड. रवींद्र पाटील, प्रदीप देशमुख, माजी चेअरमन ॲड. रोहिणी खडसे, नाना पाटील, जनाबाई महाजन, शैलजा निकम, विनोद पाटील, घनशाम अग्रवाल, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे, कर्मचारी युनियनचे सुनील पवार व अधिकारी उपस्थित होते. ना. बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा बँकेला 109 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या संस्थेचे राजकारणात वाटोळे होऊ देऊ नका. राजकारण आणि अर्थकारण हे स्वतंत्र ठेवा. जिल्हा बँकेत येतांना राजकीय जोडे बाहेर काढले पाहिजे. तसेच जिल्हा बँकेला खासगी संस्थांनाही कर्ज देता येते. लातुर जिल्हा बँकेने अनेक खासगी संस्थांना कर्ज दिलेले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा बँकेला नोकर भरतीची संख्या वाढविण्यासाठी पॅटर्न तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हा बँकेचे जे काही प्रश्न असतील त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे बैठक लावू असे आश्वासनही ना. बाबासाहेब पाटील यांनी संचालक मंडळाला दिले.
राज्यातील बहिणींचे उपकार
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. बहिणींनी केलेल्या उपकारामुळेच सरकार आज काम करीत असल्याचे ना. बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. लाडकी बहिणसाठी पैसा वळविला तर त्यात चुकीचे काय? महिलांना सक्षम करण्यासाठी काहि निर्णय घ्यावे लागतात असेही ना. पाटील म्हणाले.
पवार-खडसेंमध्ये टोलेबाजी
या सत्कार समारंभात जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथराव खडसे आणि चेअरमन संजय पवार यांच्या चांगलीच टोलेबाजी झाली. आ. खडसे म्हणाले की, एका रात्रीतून हे चेअरमन तिकडे गेले हे मला समजलेच नाही. खडसेंच्या या वाक्यावर संजय पवार म्हणाले की, नाथाभाऊंनीच मला तिकडे पाठविले असे सांगताच सभागृहात हास्याचे फवारे उडाले.
जिल्हा बँकेला राज्य बँकेकडून सहकार्य नाहीच – आ. खडसे
जिल्हा बँकेच्या अडचणीसंदर्भात संचालक आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले जिल्हा बँकेचे काही शेतकरी सभासदांची जमिन कार्यक्षेत्राबाहेर आहे आणि ते कार्यक्षेत्रांतर्गत विकाचे सभासद आहे. अशा सभासदांना कर्ज पुरवठा करता येत नसून याबाबत सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी केली. तसेच जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेकडून कुठलीही मदत मिळत नसल्याचेही त्यांनी ना. पाटील यांना सांगितले. जिल्हा बँकेची कोट्यावधी रूपयांची थकबाकी आहे. राज्य सरकारने कर्जमाफी संदर्भात स्पष्ट भूमिका घेतल्यास जिल्हा बँकेचा पैसा वसूल होईल अशी अपेक्षाही आमदार खडसे यांनी मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्याकडे व्यक्त केली.