---Advertisement---
विविध राज्यांच्या सीमांवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणारे बांगलादेशी घुसखोर आता अडचणीत आले आहेत. राजधानी दिल्लीत ९०० बेकायदेशीर घुसखोरांची ओळख पटली असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या बेकायदेशीर बांगलादेशींना हद्दपार केले जाईल. बेकायदेशीर घुसखोरांना पकडण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी सरकारने ‘ऑपरेशन पुश-बॅक’ जोरात सुरू केले आहे.
या अंतर्गत, राजधानी दिल्लीत सुमारे ७०० बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे आणि त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) डेटानुसार दिल्लीत सर्वाधिक बेकायदेशीर घुसखोर राहतात. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष पोलिस आयुक्त देवेशचंद्र श्रीवास्तव म्हणतात की. गुन्हे शाखा आणि विशेष सेल युनिट्स दिल्लीतील बांगलादेशी घुसखोरांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी वेगाने काम करत आहेत.
देवेश यांनी ओळख पटविण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या सद्यः स्थितीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले. या वर्षी आतापर्यंत सुमारे ९०० बांगलादेशींची ओळख पटवण्यात आली आहे. ज्यांच्याजवळ वैध कागदपत्रे आढळली त्यांना सोडून देण्यात आले, तर इतरांची चौकशी अजूनही सुरू आहे. बेकायदेशीर असल्याचे आढळून आलेल्यांवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ताब्यात घेणे, हद्दपार करणे आणि फौजदारी कारवाईचा समावेश आहे.
अहवालांवरून असे दिसून येते की बेकायदेशीर घुसखोरांचा एक गट आहे. त्यांच्याशी संबंधित लोक घुसखोरांना भारतात बेकायदेशीर प्रवेश मिळवून देण्यात, त्यांची बनावट कागदपत्रे बनवण्पात, मुंबई-दिल्ली-अहमदाबादमध्ये त्यांना पोहोचवण्यात आणि त्यांना नोकऱ्या मिळवून देण्यात मदत करतात. पोलिसांच्या तपासानुसार, हे घुसखोर खाजगी तसेच विमान कंपन्यांमध्ये नोकरी करत असल्याचे आढळून आले आहे. पासोबतच त्यांची मुले ईडब्ल्यूएस कोट्याच्या माध्यमातून बड्या शाळांमध्ये शिकत आहेत. \
कोणीही त्यांच्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही संशयास्पद व्यक्तीची माहिती ११२ हेल्पलाइनद्वारे किंवा त्यांच्या क्षेत्रातील एसएचओ, एसीपी किंवा डीसीपी यांना लेखी किंवा फोनद्वारे पोलिसांना द्यावी. त्यानंतर, योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असे विशेष पोलिस आयुक्त देवेशचंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले. अनेक राज्यांमध्ये बांगलादेशी बेकायदेशीर घुसखोरांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, हरयाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गोवा येथून मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांना पकडले आहे.