---Advertisement---
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस.टी. कामगारांना महागाई भत्ता ४६ टक्क्यावरुन ५३ टक्के, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास यासह कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कॅशलेस वैद्यकीय आरोग्य योजना राज्य सरकारने मंजूर केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.
इंटक महाराष्ट्र एस.टी. कामगार काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष डी.डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र एस.टी. कामगार काँग्रेसचे अध्यक्ष डी.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली एस.टी. कामगारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
३ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रमुख मागण्यांपैकी काही मागण्यांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत इंटक संघटनेचे उपाध्यक्ष दादाराव डोंगरे, कार्याध्यक्ष अरुण वीरकर, शासनाचे प्रतिनिधी म्हणून आएएस अधिकारी संजय शेट्टी सहभागी होते. २०१६ पासूनचा प्रलंबित डी.ए. फरक टप्प्याटप्प्याने देण्यास प्रशासनाने सहमती दर्शवली आहे.
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ९ महिन्यांपर्यंतची मोफत प्रवासाची सवलत वाढवून १२ महिन्यांसाठी मंजूर करण्यात आली आहे. विनंती बदल्यांसाठी तयार करण्यात आलेले ॲप कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुलभ होणार आहेत.
या मागण्यांचा पाठपुरावा
या बैठकीत जरी काही प्रमुख मागण्या मंजूर झाल्या असल्या तरी, इंटक संघटनेने इतर मागण्यांसाठीही आपला पाठपुरावा सुरू ठेवण्याचे ठरवले आहे. यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे, बडतर्फ कर्मचाऱ्यांना विशेष आवेदनाद्वारे पुन्हा नोकरीवर घेणे, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत पासद्वारे प्रवास सवलत आदींचा समावेश असल्याचे पाटील म्हणाले. पत्रकार परिषदेला सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते.