---Advertisement---
नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात भारताने पाकिस्तानकडे जाणाऱ्या सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी केला आहे. याचा विपरीत परिणाम पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील पिकांच्या पेरणीवर दिसून येत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे तेथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातही शेतकऱ्यांना उपलब्ध असलेले सिंधूचे पाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होत आहे. हा खरीप पिकांच्या पेरणीचा काळ आहे आणि जर हे काम वेळेवर झाले नाही तर शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान सरकारच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाने अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार मागील वर्षी १६ जूनला १.६ लाख क्युसेक पाणी मिळाले होते. ते यावर्षी १७ टक्के घट होऊन १.३३ लाख क्यूसेस पाणी मिळाले आहे. तसेच पाकिस्तान मधील पंजाब प्रांताला मागील वर्षांपेक्षा कमी पाणी मिळाले आहे. मागील वर्षी १.२९ लाख क्यूसेस मिळाले होते तर यावर्षी २.२५ टक्के कपात करुन १.२६ लाख क्यूसेस पाणी मिळाले आहे.
या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील सिंधू नदीशी जोडलेल्या नद्या आणि जलाशयांमध्ये कमी पाणी शिल्लक आहे. खरीप पिकांच्या पेरणीची वेळ आली आहे आणि अशा परिस्थितीत पाण्याचा तुटवडा शेतकऱ्यांसाठी एक समस्या बनला आहे. मान्सून येण्यास किमान दोन आठवडे शिल्लक आहेत, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर, भारताने पाकिस्तानला नद्यांच्या पाण्याच्या पातळीची माहिती देणे देखील बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानला पुराची तयारी करणे कठीण होऊ शकते. जर भारतातील नद्यांची पाण्याची पातळी वाढली तर पाकिस्तानला पुराचा सामना करण्यास त्रास होऊ शकतो.