---Advertisement---
अयोध्या : अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर २५ नोव्हेंबर रोजी धर्म ध्वज फडकावण्याच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मेदी आणि राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दहा हजार पाहुण्यांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे.
हा ध्वज २२ फूट लांब असून ११ फूट रूंद आहे. हा सोहळा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याइतकाच भव्य होणार असून राम मंदिराचे काम पूर्ण झाल्याचे हे प्रतीक असेल. या सोहळ्यासाठी जगातील सर्वात मोठ्या स्काऊट गाईड टीमला देखील आमंत्रित करण्यात येणार आहे. यात ३५ हजारापेक्षा जास्त कॅडेड सहभागी घेण्याची शक्यता आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, वाल्मीकि रामायणात वर्णन केलेल्या सूर्य, ओम आणि कोविदार वृक्षाच्या प्रतीका असलेला भगव्या रंगाचा ध्वज २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या येथील राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर लावलेल्या ४२ फूट उंच खांबावर फडकवला जाईल. पाच दिवसांचा हा सोहळा २१ नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि २५ नोव्हेंबरला ध्वजारोहणाने समाप्त होईल. कार्यक्रमात दहा हजार पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी राम मंदिर परिसरातील सहा अन्य मंदिरे आणि शेषावतार मंदिरावरही ध्वजारोहण केले जाईल. ही मंदिरे भगवान शिव, गणेश, सूर्य, हनुमान, माता भगवती आणि माता अन्नपूर्णा यांची आहेत.
वादळातही ध्वज राहणार सुरक्षित
राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी सांगितले की, ध्वजारोहण समारंभादरम्यान राम मंदिरासह सर्व ८ मंदिरांमध्ये विशेष पूजा-अर्चा आणि हवन केले जाईल, तसेच अन्य विधीही पार पडतील. अयोध्या आणि काशी येथील आचार्य विधी संपन्न करतील. राम मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज-स्तंभ ३६० अंश फिरणाऱ्या बॉल-बेअरिंगवर आधारित असेल. यामुळे हा ध्वज ६० किमी प्रतीतास वेगापर्यंतच्या जोरदार वाऱ्याचा सामना करू शकेल आणि वादळात त्याला कोणतेही नुकसान होणार नाही. ध्वजाच्या कपड्याची गुणवत्ता आणि वादळात त्याची सहनशक्ती याची तपासणी केली जात आहे. २८ ऑक्टोबर रोजी ध्वजासाठी अंतिम कपड्याची निवड केली जाईल.









