शहरात दुचाकी चोरीचे सत्र, वाहनधारक त्रस्त!

जळगाव:  शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सतत घडत आहेत. शहरात लॉक केलेली दुचाकी दिवसा चोरून नेण्याच्या घटना हैराण करीत आहेत. दुचाकी चोरीला अटकाव होत नसल्याने वाहन मालकांच्या चिंतेत भर पडत असल्याचे दिसते आहे.शहरात बहुतांशी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.तरीही दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत त्यानंतर तक्रारीनुसार पोलीस डायरीत गुन्हा नोंदविला जातो. अशा पध्दतीने दुचाकी चोरीच्या तक्रारींची शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात नोंद होत आहे. याशिवाय शहरात चार चाकी तसेच ट्रक चोरून नेल्याच्या मोठ्या घटनादेखील समोर आलेल्या आहेत.

दुचाकीधारकाने चोरीस गेलेल्या दुचाकीबाबतची पोलिसात विचारणा केली असता पुढील तपास सुरू आहे, असे सांगण्यात येते. चोरीस गेलेल्या दुचाकी हाती लागतील किंवा नाही, हे ठोसपणे सांगता येत नाही. परंतु दुचाकी चोरीच्या घटनांना लगाम लावण्याबाबत काही ठोस उपाययोजना केली जाणार आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलीस तपासचक्रे फिरवून चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून दुचाकीही हस्तगत करीत आहेत. गुन्हेही उघडकीस आणत आहेत. पण मग त्यामुळे गुन्हे घडण्याच्या प्रकारांना आळा बसतोय, असे म्हणता येत नाही. यासाठी दुचाकी चोरीच्या घटना रोखण्यावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी सामूहिकपध्दतीने योजना बनवून ती अंमलात आणावी, असा लोकप्रवाह आहे, याबाबत विचार होणे गरजेचे आहे.