रावेर : तालुक्यातील एक धक्कदायक बातमी सोर आली आहे. एका व्यक्तीला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका व्यक्तीला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून शरीर संबंधाचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन संशयित महिलेने खंडणी मागितली होती. सदरील तक्रारदार इसम २०१८ मध्ये स्वतःच्या कारने जळगावला जात असताना, ४३ वर्षीय महिलेने गाडीत लिफ्ट मागितली. प्रवास केल्यामुळे त्यांची मैत्री वाढली.
या मैत्रीचा फायदा घेत महिलेलने इसमाला जेवणास बोलवले. तिने कोल्ड्रीक्समध्ये गुंगीचे औषध टाकून त्यास बेशुद्ध करून त्याच्यासोबत शारीरिक संबंध केले. या प्रकारचा तिने व्हिडिओ बनवला. नंतर हा व्हीडीओ इसमाच्या घरी व सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याचा फायदा घेत ती वारंवार खंडणी मागू लागली. आपली बदनामी होऊ नये या भीतीपोटी इसमाने २३ डिसेंबर २०२३ पासून महिला व तिचा २१ वर्षीय मुलगा या दोघांच्या खात्यात ‘फोन पे’द्वारे सुमारे ११ लाख रुपये टाकले.
मागणी केल्यानंतर पैसे मिळत असल्यामुळे या महिलेची पैशांची मागणी वाढत राहिली. सतत पैश्यांच्या वाढत्या मागणीमुळे इसम त्रस्त झाला होता. या त्रासासमुळे त्याने रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना ही माहिती दिली. त्यावरून बुधवारी (ता. १९) दुपारी श्री. जयस्वाल यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, उपनिरीक्षक प्रिया वसावे, पोलिस कर्मचारी माधवी सोनवणे, महेश मोगरे, सुकेश तडवी, श्रीकांत चव्हाण यांना महिलेला अटक करण्यासाठी पाठविले.
रावेर-बऱ्हाणपूर मार्गावरील एका दुकानामागील बाजूस या इसमास महिलेने बोलावले होते. एक लाख रुपये स्वीकारताना त्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत इसमाने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव तपास करीत आहेत.
हनी ट्रॅप! रावेरमधील व्यापाऱ्याला वासनेचा मोह पडला महागात, झाली ११ लाखात फसवणूक
