मुक्ताईनगर : सोशल मीडियावरील पोस्टवर कॉमेंट केल्यावरून मोबाईलवरुन धमकावल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विनोद दयाराम वानखेडे (रा. अंतुर्ली, हल्ली मुक्काम गंगापुरी, वाई, जिल्हा सातारा ) यांनी तक्रार दिली आहे.
दिलेल्या तक्रारीनुसार, विनोद वानखेडे यांनी फेसबुक पोस्टवरून केलेल्या कॉमेंटच्या संदर्भात बबलू उर्फ लक्ष्मण रमेश सापधरे (रा. मुक्ताईनगर) यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजून 43 मिनिटांनी कॉल केला. यावेळी त्यांनी फेसबुकवरील कॉमेंटचा संदर्भ घेत विनोद वानखेडे यांना धमकावले.
बबलू सापधरे यांनी वानखेडे यांना धमकावतांना रिकामे काम करू नको असे सांगत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच यासोबत, ग्रुपमधील अन्य लोकांच्या मोबाईलवरून देखील आपल्याला धमक्या आल्याचे विनोद वानखेडे यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. यानुसार, बबलू उर्फ लक्ष्मण रमेश सापधरे यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ लिलाधर भोई हे करत आहेत.