एकाच गावातील दोन बियाणे विक्रेत्यांवर एकावेळी गुन्हा दाखल ; बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Department of Agriculture : चाळीसगाव तालुक्यातील दहीवद गावातील बियाणे विक्रेता मे.वाघ कृषी केंद्र आणि मे. गौरव कृषी केंद्र यांनी मे.टियारा सिडस् या कापुस उत्पादकाचे ब्रम्हा या कापूस बियाणे वाणाचे जादा दराने विक्री केल्याने एकाच गावातील दोघा विक्रेत्यांविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामुळे चाळीसगाव तालुक्यातील बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

जादा दराने बियाणांची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकास मिळाली. या अनुषंगाने नाशिक विभाग विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी व जि.प. जळगाव कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली. यात विभागीय व जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहकाला मे.वाघ कृषी केंद्र आणि मे. गौरव कृषी केंद्रावर कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी पाठवले. यावेळेस बियाणे विक्रेते यांनी रक्कम रुपये ८६४/- चे ब्रम्हा हा वाण रक्कम रुपये ११००/- किमतीस शेतकऱ्यास विक्री करताना रंगे हात पकडले.या अनुषंगाने ४ जुन रोजी विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक नितेंद्र पानपाटील यांनी वाघ कृषी केंद्राच्या रविंद्र युवराज वाघ व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक
विकास बोरसे यांनी मे.गौरव कृषी केंद्राच्या गौरव बापुराव सोनजे यांच्यावर मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

एकाच गावातील दोन बियाणे विक्रेत्यांवर एकावेळी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईसाठी चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी संजय चव्हाण, कृषी अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव प्रविण महाजन, मंडळ कृषी अधिकारी धनंजय पाटील, कृषी पर्यवेक्षक चेतन निकम, कृषी सहायक अभिमन्यु झोडगे, सुभाष राठोड यांनी परिश्रम घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

या कारवाईच्या अनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी नाशिक विभागातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केले आहे की, कोणीही जादा दराने बियाणे खरेदी करू नये. बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करताना पक्की पावती मागावी. बियाणे खरेदी करताना कुणालाही अडचण असल्यास कृषी विभागाकडे तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.