येवला : येवल्यात मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. रविवारी मनोज जरांगे पाटील येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले. त्यावेळी मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक आमनेसामने आल्यानंतर दोघ गटात जोरदार घोषणाबाजी झाली.
मनोज जरांगे पाटील हे काल येवला दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी येवल्यात आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यानंतर नव्याने साकारलेल्या शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते आपल्या सभास्थळाच्या दिशेला निघाले. पण यावेळी अचानक मराठा कार्यकर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.
पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी शिवसृष्टीसमोर ठिय्या मांडला. मराठा आंदोलक ठिय्या मांडल्यानंतर प्रचंड आक्रमक झाले. काही मराठा कार्यकत्यांनी रास्ता रोको केला. मराठा आंदोलकांनी मनमाड नगर राज्य मार्गावरील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको केला. भुजबळ समर्थकांनी मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केला. मराठा आंदोलकांच्या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मराठा समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना रास्ता – रोको मागे घेण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. यानंतर शिवसृष्टी स्वयंसेवक, आंदोलक कार्यकर्ते व इतर अशा 40 ते 44 जणांविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतुकीस अडथळा, सार्वजनिक उपद्रव, जमाव गोळा करणे, तसेच पोलिसांनी सूचना देवूनही अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाची दडपशाही असेल तर ती मोडून काढायला मी खंबीर : जरांगे पाटील
शांतता ठेवा, कुणाची दडपशाही असेल तर ती मोडून काढायला मी खंबीर आहे. मात्र आपण मोठे भाऊ असून, आपणच असे वागलो तर चुकीचा संदेश जाईल. आपण आपल्या मार्गाने काम करत राहू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनाचा चांगला दिवस असून, आज आपण शांतता ठेवू या. सर्वांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर हे आंदोलन शांत झाले.