जळगावमध्ये उद्धव ठाकरेंना बसणार हादरा; नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश?

जळगाव । राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र त्यापूर्वी जळगावात शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेचे ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यात ठाकरे गटातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता जळगाव महापालिकेतील ठाकरे गटाचे चार ते पाच माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौऱ्यात हे नगरसेवक शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 1 फेब्रुवारीला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मनपातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणूक लढलेले तसेच ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या सुद्धा नावाची चर्चा होत आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून शासकीय दौऱ्यासोबत शिवसेना पक्षाचा संघटनात्मक आढावा घेतला जाणार असून, ठाकरे गटात दुर्लक्षित व संधी न मिळालेले नाराज शिंदे गटात प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत मिळत आहेत, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, “आमच्यावर लागलेला गद्दारीचा डाग जनतेने पुसून टाकलेला असून, येथे तर शिवसेनेचा भगवा चालेल.” जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका तसेच पंचायत समितीवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.