अत्याचारात मृत्यू प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाला मिळणार नोकरी

---Advertisement---

 

धुळे : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील शासकीय-निमशासकीय पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यात धुळे जिल्ह्यातील २०१२ ते जुलै २०२५ या काळात जिल्ह्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा व शिरपूर, अशा १७प्रकरणांचा समावेश असून, नोकरीसाठी पात्र वारसांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा दक्षता नियंत्रण समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.

या अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांत दिवंगत व्यक्तीच्या एका पात्र वारसाला नोकरी देण्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून २० नोव्हेंबर २०२५ रोजी पारीत केला आहे. हा शासन निर्णय पारीत झाल्यानंतर १ डिसेंबरला १५ पीडित कुटुंबियांची बैठक समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात घेण्यात आली. बैठकीत शासन निर्णयातील नमूद निकषांबाबत माहिती देण्यात येऊन प्रशासनाच्या प्रत्येक निर्णयातून सर्वसामान्य जनतेचा विश्वास व समाधान वृद्धिंगत व्हावे, त्यादृष्टीने प्रकरणांबाबतची कार्यवाही पारदर्शक व गतीने पूर्ण होईल, असे आश्वासित करण्यात आले. संबंधित १७ कुटुंबांपैकी १७ प्रस्ताव अप्राप्त आहेत. त्यामुळे त्यांनी त्वरित पात्र वारसाला नोकरी देण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले.

सर्व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तीने शहरातील साक्री रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याभवनातील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात शासन निर्णयात नमूद केल्यानुसार परिशिष्ट १ ते ६ व त्यानुसार संपूर्ण दस्तऐवजांसह अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा दक्षता नियंत्रण समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---