जरांगे पाटलांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला! आमदार प्रसाद लाड यांचे वक्तव्य

मुंबई : मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला आहे, असे वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. मनोज जरांगेंच्या सतत देवेंद्र फडणवीसांबाबतच्या विधानांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत? हा संशोधनाचा विषय आहे, असेही ते म्हणाले.

https://twitter.com/i/status/1813824595989843991

प्रसाद लाड म्हणाले की, “मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाला आहे. हा आजार त्यांनी पसरवून टाकला आहे. ६० वर्षांत जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले. मराठ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाव्या म्हणून आरक्षण दिलं. तरीसुद्धा जरांगे पाटील कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत?, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ज्याप्रकारे मनोज जरांगे देवेंद्रजींचा आणि भाजपचा द्वेष करतात ते योग्य नाही.”

“जरांगेंनी काल प्रविण दरेकरांना आव्हान दिलं. पण जरांगे पाटील साहेब, खरंतर आपल्या आजूबाजूची पिलावळ तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत. आम्ही तुमचं आवाहन स्वीकारायला तयार आहोत. परंतू, तुम्ही चर्चेला तयार आहात का? की एखाद्याच्या छत्राखाली येऊन तुम्ही फक्त द्वेषच करणार आहात?,” असा सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “ज्या समाजाचं तुम्ही नेतृत्व करत आहात आम्हीसुद्धा त्याच समाजातून येतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे, परंतू, एका विशिष्ठ व्यक्तीला टार्गेट करुन राजकारण करणं चुकीचं आहे. तुम्हाला राजकारणच करायचं असल्यास आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं. तुम्हाला समाजासाठी लढायचे असेल तर चर्चेतून मार्ग काढणे आवश्यक आहे,” असेही प्रसाद लाड म्हणाले.