जळगाव : शासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील आता सायबर ठगांपासून सुरक्षित राहिलेले नाही. ठगांचा धाडसीपणा इतका वाढला आहे की त्यांनी भुसावळ रेल्वे विभागाचे डीआरएम इती पांडे यांच्या नावाने व्हॉट्सॲप अकाउंट तयार केले. या अकाउंटवर डीआरएम इती पांडे यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. खाते चालवणारी व्यक्ती, डीआरएम असल्याचे भासवत आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात ४ जुलै रोजी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, एका अज्ञात मोबाईलधारकाने व्हाट्सअपवर भुसावळ मंडळ विभागाच्या डीआरएम इती पांडेय यांचा फोटोचा वापर करून खाते उघडले. त्या खात्यावर डीआरएम इती पांडेय यांचा फोटो लावून रेल्वेचा अधिकारी असल्याचे दर्शविण्यात आले आहे. हा प्रकार गुरूवार ४ जूलै रोजी उघड झाला. यासंदर्भात भुसावळ रेल्वे सुरक्षा बल विभागाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त अशोक कुमार यांनी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी ४ जुलै रोजी रात्री ८ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात बनावट व्हॉटसॲप खाते तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे करीत आहे.