कासोदा आठवडे बाजारात मोबाइल चोरट्यांचा धुमाकूळ

कासोदा : येथील मगळवारी आठवडे बाजार असतो. जवळपास १४ ते १५ खेडी लागून आहेत. शेतकरी व मजूर वर्ग साधारणतः ३ ते ५ वाजेदरम्यान बाजारासाठी येतात या वेळी बाजारात मोठी गर्दी उसळलेली असते. त्याच वेळी चोरट्या महिला व त्यांच्यासोबत लहान मुले बाजारात गर्दी करीत असतात. मोबाइल चोरताना धक्का मारणे व लगबगीने ढकलणे असे प्रकार करतात. बाजार करणाऱ्या व्यक्तीला गर्दीत असे होते म्हणून ते दुर्लक्ष करतात त्याचा फायदा घेऊन मोबाइल व पर्स चोरली जाते. सोबत असलेल्या व्यक्तीकडे ते चोरलेल्या वस्तू व इतर साहित्य देऊन तेथून पळ काढतात. अशा चोरी करण्याच्या पद्धतीचा वापर सराईत चोरट्यांकडून केला जातो, अशी माहिती बाजारातील व्यक्तींकडून मिळाली. बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा ही टोळी सक्रिय झालेली दिसते.

कासोदा पोलीस स्टेशनमधील बऱ्याच कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. नवीन स्टाफ आला आहे. बाजारात पोलिसांची गस्त असली पाहिजे, त्यामुळे अशा चोरट्यांना पायबंद होईल अशी नागरिकांची मागणी आहे.

आजच्या आठवडे बाजारात ३ व्यक्तींचे मोबाइल व महिलेची पर्स चोरण्यात आली. त्यात बाजाराचे १७०० रुपये व मोबाइलची चोरी झाली आहे. या घटनेकडे कासोदा पोलिसांनी जातीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

कासोदा पोलीस स्टेशन येथे सपोनि नीलेश राजपूत आल्यानंतर बरीचशी शिस्त दिसून येत असली तरी अशा चोरट्यांमुळे कासोदा पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ४ व्यक्तीनी मोबाइल चोरी झाल्याची माहिती पोलीस स्टेशनला जाऊन दिली व याबाबत तक्रार केलेली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश राजपूत हे तातडीने पोलीस स्टेशनला हजर झाले व त्यांनी आपल्या स्टाफला त्वरित चौकशीचे आदेश दिलेले आहेत. बघू या कासोदा पोलीस मोबाइल चोरांना पकडतात की नेहमी प्रमाणे तपास सुरू आहे, असे उत्तर मिळते याची प्रतीक्षा तक्रारदार यांना आहे.