नंदुरबार : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथुन चार चाकी वाहन चोरी झाल्याची घटना 13 ते 14 डिसेंबर दरम्यान घडली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख रुपये किमतीचे वाहन हस्तगत केले आहे.
सूत्रानुसार, खेडदिगर गावातील हिरा मोती फर्टिलायझरचे बाजुला पंडीत गंगाराम चौधरी यांचे 2 लाख किमंतीचे पिकअप वाहन (क्र.एम.एच.39, सी. 5583) हे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याप्रकरणी म्हसावद पोलिसांत अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल आहे.
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले वाहन धुळे शहरातील 80 फुटी रोडावर रस्त्याच्या बाजूला मिळून आल्याने त्यांनी चाळीसगांव रोड पोलीस ठाणे येथे आणून उभे केलेले होते.
पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ एक पथक तयार करुन धुळे येथे रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहनाबाबत खात्री करुन ताब्यात घेतले होते, परंतु चोरी करणारे आरोपी मात्र अद्याप मिळून आलेले नव्हते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयीत आरोपी याचा खेडदिगर गावात व परिसरात शोध घेतला असता खेडदिगर गावात मारुती मंदीराजवळ सुनिल सुरेश पावरा रा. बाजार पेठ मार्ग, बोरकुंड ता. जि. धुळे ह.मु. बेहडीया ता. पानसेमल,जिल्हा बडवाणी,मध्य प्रदेश याला अटक केली.सुनिल पावरा यानेे सुमारे 8 ते 9 दिवसापूर्वी त्याचा नातेवाईक पिंटु ओंकार भिल रा. बेहडीया ता. पानसेमल जि.बडवाणी याच्या मदतीने खेडदिगर येथून रात्रीच्यावेळी एक पिकअप वाहन चोरी केल्याचे सांगितले.
तसेच चोरी केलेले पिकअप वाहन हे धुळे येथे विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून गेलो होतो, परंतु सदरचे वाहन विक्री न झाल्याने ते धुळे शहरातील 80 फुटी रोडावर रस्त्याच्या बाजूला उभे करुन तेथून तो व त्याचा साथीदार पिंटु भिल तेथून पळुन गेलो बाबत सविस्तर हकिगत सांगितली. त्याअनुषंगाने पिंटु ओंकार भिल रा. बेहडीया ता. पानसेमल जिल्हा बडवाणी याचा बेहडीया व आजू-बाजूच्या परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी व गुन्ह्यातील 2 लाख रु. किं.चे एक पांढर्या रंगाचे पिकअप वाहन (क्र.एम.एच.39, सी. 5583)असे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार विनोद जाधव, सजन वाघ, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, गोपाल चौधरी, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली आहे.