जळगाव : शहरातील जिल्हापेठ परिसरात एका बंद घरात फ्रीजने पेट घेतल्याने फ्रीजसह घरातील कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवार, २४ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाच्या बंबाने ही आग विझविण्यात आली. याबाबत रात्री उशीरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
जिल्हापेठ परिसरात प्रभाकर नाना पाटील यांचे घर आहे. सोमवार, २४ रोजी पाटील हे घर बंद करून बाहेर गेले होते. त्यावेळी दुपारी चार वाजेच्या सुमारास घरातून धूर येत असल्याचे शेजारील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी इतर रहिवाशांनाही माहिती देत अग्नीशमन विभागाला कळविले. अग्नीशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.
घरी कोणीही नसल्याने दरवाजा तोडून पाण्याचा मारा करत आग विझवण्यात आली. फ्रीजने पेट घेतल्याने ही आग लागल्याचे दरवाजा तोडल्यानंतर लक्षात आले. त्यात फ्रीज जळून खाक होण्यासह घरातील कपडे, वायरिंग व इतर साहित्यही जळाले. आग विझवल्यानंतरदेखील अर्धा ते पाऊण तास घरातून धूर निघत होता. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.