जळगाव : उपवर लग्नाच्या वयात असणार्या गरजू व्यक्तींना हेरून त्यांच्याशी मध्यस्थांमार्फत संपर्क करून दोन ते पाच लाखांपर्यंत घेत फसवणूक करणार्या आंतरराज्यीय महिलांच्या टोळीचा कासोदा पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला असून तीन वधूंसह दोन दलाल असणार्या महिलांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.
कासोदा पोलीस स्टेशनला दाखल फिर्यादीनुसार, मोना दादाराव शेंडे (25), सरस्वती सोनू मगराज (28, दोन्ही रा. रायपूर, छत्तीसगड), अश्विनी अरुण थोरात (26, रा. पांढुरना, मध्य प्रदेश) यांचे कासोदा येथील तीन तरुणांसोबत सरलाबाई अनिल पाटील (60) व उषाबाई गोपाल विसपुते (50, दोन्ही रा. नांदेड, ता. धरणगाव) 16 एप्रिल 2024 रोजी विवाह लावून दिले होते. या मुली विवाहानंतर काही दिवस चांगला संसार करतात आणि विश्वास संपादन करून घरातून पैसे, सोने लांबवून पळ काढतात अशी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याची गोपनीय माहिती कासोदा येथील पोलीस स्टेशनला मिळाली होती. यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी मार्गदर्शनात कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीलेश राजपुत, सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील, राकेश खोंडे, किरण गाडीलोहार, इम्मान पठाण, नितीन पाटील, सविता पाटील यांच्या पथकाने दलाल असलेल्या नांदेड (ता. धरणगाव) येथील सरलाबाई पाटील व उषाबाई विसपुते यांची सखोल चौकशी केली. त्यांनी उपवर तिन्ही मुलांच्या घरच्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी विवाह लावून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी संपर्क करीत, खोटे सांगून विवाहासाठी उपवर तिन्ही मुलांच्या कुटुंबियांकडून सर्व मिळून चार लाख 13 हजार रुपये उकळत विवाहित असलेल्या मोना शेंडे, सरस्वती मगराज व अश्विनी थोरात यांच्याशी विवाह लावल्याचे चौकशीत गुन्ह्याची उकल झाली.
पोलिसांनी सांगितले की, एका संशयित महिलेने सर्व प्रकार कथन केला. आम्ही तिघींचा यापूर्वी विवाह झालेला असून, आम्हाला मुले आहेत आणि आम्ही तिघी फसवणुकीचा प्रकार करण्यासाठी घरातून महाराष्ट्रात आलो आहोत. कासोद्यातील तिन्ही तरुणांसह नांदेडच्या दोन्ही साथीदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे तिने कबूल केले आहे