कानोसा
प्रतापगडावर ज्या ठिकाणी Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता व जिथे आज त्याची कबर आहे त्या ठिकाणी अफजल खान वधाचा देखावा उभारण्यात येईल, अशा पद्धतीचे निर्देश शिंदे सरकारने नुकतेच पर्यटन सचिवांना दिले आहेत. या निमित्ताने पर्यटनाला चालना मिळेल. ‘लाईट आणि साऊंड’ शो तिथे झाला तर फारच उत्तम कार्य होईल. यानिमित्ताने पर्यटकांना शिवछत्रपतींचा इतिहास अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल. आपल्या गौरवशाली इतिहासाचे प्रदर्शन होणे हे अतिशय आवश्यक आहे. यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळू शकेल.
अफजल खान हा आदिलशाहीचा एक मातब्बर सरदार होता. तो धूर्त, कपटी व क्रूर होता. अनेक हिंदू राजांना त्याने कपटाने भेटीला बोलावून ठार मारलेले होते. अनेकांना त्याने जेरबंद केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावालाही त्याने लढाईच्या दरम्यान एकटे पाडून शत्रूच्या हातून मरू दिले होते. त्यामुळे अफजल खानाचा इतिहास हा विश्वासघाताचाच इतिहास होता. हा अतिशय आडदांड व बलाढ्य असा सरदार होता. Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने ज्या हिंदवी स्वराज्याचे रोपटे लावले होते, ते रोपटे उपटून काढण्यासाठी, स्वराज्याच्या प्राणाला नख लावण्यासाठी हा अफजल खान स्वराज्यात दाखल झाला होता. स्वराज्यात येताना त्याने पंढरपूरच्या विठोबाला अपवित्र केले, तुळजाभवानीची मूर्ती भग्न केली. ठिकठिकाणी मिळेल तो प्रदेश लुटत अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना पकडायला वाई येथे आला. छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस प्रतापगडावर होते. खानाने शिवाजी महाराजांना आपल्या भेटीला येण्याचा निरोप पाठविला. परंतु छत्रपती शिवरायांनी अतिशय चातुर्याने खानालाच गडावर बोलाविले. भेटीदरम्यान राजांना मिठी मारत अफजल खानाने महाराजांच्या पाठीत कट्यार खुपसली. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय चलाखीने व चपळाईने आपल्या हातात लपवून ठेवलेली वाघनखं खानाच्या पोटात खुपसली व त्याचा कोथळा बाहेर काढला. खान ठार झाला. महाराजांचे मावळे खानाच्या फौजेवर तुटून पडले. प्रचंड कत्तल करण्यात आली. आदिलशहाचा इतका मातब्बर सरदार शिवाजीराजे भोसले नावाच्या एका नवीन स्वराज्य उभारणार्या राजाने मारला, ही त्या काळातली फार मोठी गोष्ट होती. स्वराज्य संपवायला आलेली प्रत्येक व्यक्ती; ती कितीही बलाढ्य असेल, क्रूर असेल, उलट्या काळजाची असेल; परंतु त्याचा कोथळा येथे काढला जाईल. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांना निर्माण करणारी भूमी आहे. ही भूमी मावळ्यांना निर्माण करणारी भूमी आहे. स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण करणारे लोक या भूमीत निर्माण झालेले होते व त्यांच्यामुळेच आजचा दिवस आम्हाला दिसतो आहे. अशा पद्धतीचा इतिहास हा नवीन पिढीला समजावा यासाठी तेथे अफजल खान वधाचे स्मारक होणे हे आवश्यक आहे.
मागच्या 25 वर्षांमध्ये प्रतापगडावर अफजल खानाचे वर्चस्व आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अफजल खानाच्या कबरीचे फार मोठे रूप तिथे उदयास आले होते. कबरीचे एका मोठ्या मजारीत रूपांतर झाले होते. 19 खोल्यांचे भव्य निवासस्थान तेथे उभे राहिले होते. प्रचंड प्रमाणावर अतिक्रमण व समाज विघातक तत्त्वांचा तिथे वावर वाढला होता. काँग्रेसच्या शासनाच्या काळात अफजल खानाचे उदात्तीकरण झाले, हे सत्य नाकारता येत नाही. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे उदात्तीकरण होत आहे, हे पण सत्य कोणाला नाकारता येणार नाही. कोणतेही सरकार अफजल खानाच्या कबरी जवळचे हे अतिक्रमण पाडायला धजत नव्हते. कारण अफजल खानाच्या कबरीला हात लावणे म्हणजे मुसलमानांना नाराज करणे आहे, अशा पद्धतीचा या सरकारचा समज होता. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्येसुद्धा मुसलमान होते. त्यांना नमाज पढण्याकरिता, मशिदी बांधण्याकरिता Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांनी जागा दिली होती. अनेक ठिकाणच्या दर्ग्यांना सरकारतर्फे मदत केली जात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहणारे मुसलमान ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रजा होती व त्यांचा राजा म्हणजे राजा शिवाजी होते.
अफजल खान हा विजापूरच्या आदिलशहाचा सरदार होता व तो स्वराज्यावर चालून आलेला होता. तो स्वराज्याचा शत्रू होता. म्हणजे तो महाराष्ट्रात राहणार्या सर्व हिंदू आणि मुसलमान यांचाही शत्रूच होता. त्यामुळे अफजल खानाच्या कबरीवर बांधण्यात आलेली इमारत असेल किंवा इतर कुठलेही अतिक्रमण असेल ते पाडल्यामुळे महाराष्ट्रातला सर्वसामान्य मुसलमान नाराज कसा काय होईल? परंतु, राजकारणासाठी या आधीच्या सरकारने त्याचा असा अर्थ काढलेला होता. Chhatrapati Shivaji Maharaj शिवाजी महाराज हे काही केवळ मराठ्यांचे किंवा हिंदूंचे राजे नव्हते तर ते हिंदवी स्वराज्याचे राजे होते. त्यामुळे हिंदवी स्वराज्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती ही त्यांची प्रजा होती. तो मुसलमान का असेना, पण तो महाराजांची प्रजाच होती. परंतु, राजकारणी लोक सोयीस्करपणे अफजल खानाचा संबंध मुसलमानांशी जोडतात. अनेक गणपती मंडळात किंवा काही ठिकाणी दहशतवाद असाच संपवावा लागतो, अशा शीर्षकाखाली अफजल खान वधाचे चित्र छापण्यात आले होते. त्यावेळेस सरकारने त्यावर बंदी घातली होती. अफजल खानाला मारताना छत्रपती शिवाजी महाराजांना दाखविण्यात आले तर मुसलमानांना वेदना होण्याचे काहीच कारण नाही. कारण त्यांचा अफजल खानाशी काहीही संबंध नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. परंतु, राजकारणी लोक जाणीवपूर्वक अफजल खान हा मुसलमान होता म्हणजे महाराष्ट्रातले सर्वच मुसलमानांचा या अफजल खानाशी संबंध आहे, अशा पद्धतीचा देखावा निर्माण करतात. तो खरा आहे की खोटा हे मुस्लिम समाजाने आपल्या आचरणातून दाखवून द्यावे. ओवेसी संभाजीनगरच्या दौर्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवर गेले. आपण या गोष्टीला लक्षात घेतले पाहिजे की, तो आदिलशहा असेल, कुतूबशहा असेल, निजामशाह असेल किंवा औरंगजेब असेल; हे लोक आपल्याला एतद्देशीय मानत नव्हते. ते स्वतःला तुर्क समजायचे. हिंदुस्थानी मुसलमान नाही. आम्ही तुर्क आहोत म्हणजे येथील मुसलमानांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशा पद्धतीची त्यांची भावना होती. त्यामुळे त्यांच्या कबरीवर जाऊन त्यांचे उदात्तीकरण करण्याचे ओवेसींना असो किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढार्यांना काहीही कारण नाही.
ज्या इतिहासातून समाजाला प्रेरणा मिळेल, भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल, त्यांच्यामध्ये शौर्य, देशभक्ती इत्यादी गुण निर्माण होतील अशा पद्धतीचा इतिहास सरकारने जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शित करणे गरजेचे आहे. अफजल खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला वध ही इतिहासातील एकमेवाद्वितीय घटना आहे आणि म्हणून त्या घटनेचा देखावा प्रतापगडावर उभारण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी इतिहासातील प्रमुख लढाया झालेल्या आहेत, मोठे विजय संपादन करण्यात आलेले आहेत; ज्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली; अशा घटना घडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांनी आपला देह ठेवला असेल, ज्या ठिकाणी बाजीप्रभूंच्या बलिदानाने घोडखिंड पावनखिंड झालेली असेल, ज्या ठिकाणी Chhatrapati Shivaji Maharaj शिवाजी महाराजांच्या वेषामध्ये असल्यामुळे शिवा काशिदला आपले प्राण अर्पण करावे लागले असेल, जेथे मुरारबाजीचे धड लढता लढता पडले असेल, जेथे शाहिस्तेखानाची बोटे कापले गेली असेल अशा सर्व ठिकाणी त्या प्रसंगाचे देखावे लाईट अँड साऊंड शो, संग्रहालय, चित्र प्रदर्शनी उभारली गेली पाहिजे. हे इतिहासाचे प्रकटीकरण आहे. यातून समाज प्रेरणा घेईल. देश प्रेरणा घेईल. भावी पिढ्या प्रेरणा घेतील असा विश्वास आहे.
– अमोल पुसदकर
– 9552535813
(लेखक प्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)