चिन्मय प्रभूंच्या अटकेनंतर बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारात एका वकिलाचा मृत्यू; काय आहे प्रकरण ?

#image_title

Chinmay Prabhu: इस्कॉनचे धर्मगुरू आणि अल्पसंख्याक हिंदू समाजावरील हल्ल्यांविरुद्ध शांततेच्या मार्गाने आवाज उठवणारे चिन्मय प्रभू यांना बांगला देशातील मोहम्मद युनूस सरकारने देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक केली. त्यांना मंगळवारी चितगावच्या सहाव्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले. मात्र त्यांना जामीन मंजूर झाला नाही. दरम्यान न्यायालयात जमलेल्या हिंदूंवरही पोलिसांनी लाठीमार केला.

शेख हसिना यांचे सरकार उलथवल्यानंतर बांगला देशात हिंदूंविरुद्ध झालेल्या भयावह हिंसाचाराविरुद्ध चिन्मय प्रभू यांनी शांततामय मागनि हिंदूंचा मोर्चा काढला होता. हिंसाचाराच्या घटनांनंतर ते याविरोधात सातत्याने पुढाकार घेत आले. त्यामुळे खवळलेल्या फिरोज खान या सत्ताधारी बीएनपी पक्षाच्या नेत्याने चितगावात चिन्मय प्रभूविरोधात राजद्रोहाची व राष्ट्रध्वजाच्या अवमानाची तक्रार दिली होती. या जुन्या तक्रारीच्या आधारावर व त्याला कुठलाही आधार नसताना चिन्मय प्रधूंना सोमवारी पोलिसांनी अटक केली.

अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी निदर्शने केली. या हिंसाचारात एका वकिलाला आपला जीव गमवावा लागला. सैफुल्ला इस्लाम असे मृत सहायक सरकारी वकिलाचे नाव आहे. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. असोसिएशनच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी सैफुल्ला इस्लामला जबरदस्तीने सभागृहात ओढले आणि त्याची हत्या केली. स्थानिक बंगाली वृत्तपत्र प्रथम आलोच्या मते, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, आंदोलकांनी वकिलाला मारण्यापूर्वी त्यांना बेदम मारहाण केली.

अलीकडेच, बांगलादेशातील इस्कॉनच्या ज्येष्ठ धार्मिक नेत्याच्या प्रकरणाची सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आणि चिन्मय प्रभूची तुरुंगात रवानगी केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याच्या अटकेविरोधात संतप्त लोकांनी निदर्शने केली, त्यादरम्यान हिंसाचार उसळला.

भारत सरकारकडून नाराजी
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी केले असून, बांगला देशात हिंदूंवर हल्ले करणारे गुन्हेगार मोकाट आहेत; पण अहिंसेची शिकवण देणाऱ्या एका हिंदू संताला अटक करण्यात आली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे भारताने या निवेदनात म्हटलेले आहे.