न्यू ऑरलीन्स । अमेरिकेतील न्यू ऑरलीन्स शहरात नववर्षाच्या स्वागतादरम्यान मोठी दुर्घटना घडली. प्रसिद्ध बॉर्बन रस्त्यावर एका चारचाकी वाहनाने गर्दीत घुसून लोकांना चिरडलं. या घटनेनंतर वाहनचालकाने वाहनातून उतरत गोळीबार केला. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
वृत्तनुसार, बुधवारी रात्री नववर्षाच्या पहिल्या काही तासांत ही घटना घडली. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. गर्दीत वाहन घुसवून झालेल्या या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरील साक्षीदारांच्या मते, नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमले होते. अचानक एक ट्रक गर्दीत घुसला आणि ड्रायव्हरने वाहनातून बाहेर येत गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.
स्थानिक प्रशासनाचा इशारा
न्यू ऑरलीन्सच्या आपत्कालीन यंत्रणांनी आधीच गर्दीच्या ठिकाणी संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता. नागरिकांनी गर्दीच्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते.
गव्हर्नर लँड्री यांची प्रतिक्रिया
लुइसियानाचे गव्हर्नर जेफ लँड्री यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करताना, “बॉर्बन स्ट्रीटवरील हल्ला भयानक आहे. नागरिकांनी या भागापासून दूर राहावे,” असे ट्विट केले. स्थानिक प्रशासनानेही या घटनेला हल्ला मानले असून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून कारवाई सुरू
न्यूजच्या हवाल्यानुसार, पोलिसांचे प्रवक्ते म्हणाले की, घटनेनंतर त्वरीत कारवाई करण्यात आली असून हल्लेखोराला ताब्यात घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पर्यटनस्थळांवर सतर्कतेचे आवाहन
बॉर्बन रस्त्यावर नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते. अशा घटनांमुळे स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ही घटना नववर्षाच्या आनंदावर पाणी फिरवणारी ठरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.