---Advertisement---
बिहारच्या राजकारणात मोठी आणि ऐतिहासिक उलथापालथ होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर आता बिहार राज्यात सत्ताबदलाच्या हालचालींना वेग आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजपाच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नितीश कुमार केंद्रात मंत्री होणार नसून ते राज्यसभा सदस्य म्हणूनच सक्रिय राहणार असल्याचं समजतंय.
बिहारच्या राजकारणातील सत्ताबदलामागे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे BJP आणि JDU यांच्यात ठरलेला ‘रिव्हर्स फॉर्म्युला’. आतापर्यंत जेडीयूचा मुख्यमंत्री आणि भाजपाचे उपमुख्यमंत्री अशी रचना होती. मात्र आता चित्र पूर्णपणे बदलणार असून भाजपचा मुख्यमंत्री आणि जेडीयूचे दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यामुळे बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ होणार आहे.
मंत्रिमंडळाच्या वाटपातही बदल होणार आहे. भाजपकडे मुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती राहतील, तर जेडीयूला उपमुख्यमंत्रीपदासह मोठे प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. गृह मंत्रालय भाजपकडेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारच्या राजकारणातील सत्ताबदलात नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. या नव्या राजकीय समीकरणामुळे बिहारमध्ये पुढील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल घडण्याची शक्यता असून, राज्याच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याचे मानले जात आहे.









