---Advertisement---
नंदुरबार : मनी लाँड्रिंगमध्ये अडकविण्याची धमकी देत एकाची ८४ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केली. ही घटना नंदुरबारातील एकाबाबत घडली. याबाबत साडेपाच महिन्यांनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबार येथील मच्छिंद्र दौलत सोनवणे (रा. जयंतीलाल नगर) यांना ६ जानेवारी रोजी एका मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला. संबंधित व्यक्तीने तुमचे देशात खोटे बँक खाते असून, त्यातून मनी लाँड्रिंगमध्ये सहभाग आहे. त्याचे कमिशन मिळत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.
तुमचे बँक अकाऊंट बंद करावयाचे असेल तर ८४ हजार ३०२ रुपये पाठवावे लागतील. अन्यथा मनी लॉड्रिंगच्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देखील समोरच्या व्यक्तीने दिली. घाबरलेल्या सोनवणे यांना काय करावे कळत नव्हते. वारंवार धमकी देऊन त्यांना स्टेट बैंक खात्यातून ८४ हजार ३०२ रुपये संबंधित व्यक्तीने दिलेल्या नंबरवर पाठविण्यास भाग पाडले.
याबाबत साडेपाच महिन्यांनंतर मच्छिंद्र सोनवणे यांनी नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पंकज महाले करीत आहेत.