पत्रांचा घोळ अन् शाळांची धावपळ

तरुण भारत  लाईव्ह  न्यूज़ जळगाव : कला संचालनालय मुंबई येथून शालेयस्तरावर शासकीय रेखाकला परीक्षा होत असतात. यात इलेमेंटरी व इंटरमिजिएट दोन्ही परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना वाढीव एसएससीला अतिरिक्त गुण दिले जातात. तसेच वाढीव गुण इतर कला प्रकारातही दिले जातात मग त्यात लोककला प्रकारात संगीत, गायन, वादन, नृत्य,नाट्य यांचाही समावेश होतो. अशाच कला संचालनालय व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक शाळांना नोव्हेंबर महिन्यात एक पत्र पाठवले आहे. त्यात 15 जानेवारी 2023 पर्यंत एसएससी प्रविष्ट व शासकीय रेखा कला व लोककला प्रकारात प्रविष्ट विद्यार्थ्यांनचे गुण वाढीचे प्रस्ताव बोर्डाकडे पाठवण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना केलेल्या आहेत. त्यानुसार सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व कला शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे.

सप्टेंबर 22 ला झालेल्या शासकीय रेखाला परीक्षेचा आजपर्यंत निकाल लागलेला नाही. मागच्या वर्षीचे इलेमेंटरी व इंटरमिजिएट प्रमाणपत्र केंद्रांना मिळालेले नाही. मग मुख्याध्यापक व कला शिक्षकांनी मार्क वाढ प्रस्ताव कसा बनवावा ? असा यक्ष प्रश्न शाळांना व विद्यार्थ्यांना पडलेला आहे.

महाराष्ट्र शासनाने कलासंचनालयावर अंकुश ठेवून होणारा घोळ थांबवावा. विद्यार्थी वाढीव कलागुणांपासून वंचित राहू नये यासाठी व्यवस्था करावी. दरवर्षी शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल दिवाळीनंतर 15 दिवसातच कसा लागेल याचे नियोजन करून निकालानंतर पंधरा दिवसातच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र कसे मिळतील ती व्यवस्था करावी.

गुणवाढ प्रस्ताव माहिती ऑनलाईन कशाप्रकारे भरता येईल याची व्यवस्था करावी. किंवा रेखाकला परीक्षा फॉर्म भरतानाच गुणवाढ प्रस्ताव ऑनलाईन भरावा असे पालक व शिक्षकांकडून बोलले जात आहे.

शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन पत्र काढावे. शिक्षकांना शालेय शिक्षणासोबत अतिरिक्त कामांचा भडीमार करू नये. कलासंचालनालयाने निकाल त्वरित लावून प्रमाणपत्र वेळेत वाटप करावे. कला गुण मार्कवाढीसाठी कोणतीही फी आकारू नये. विद्यार्थ्यांना बोर्डाकडून एसएससीचे सीट नंबर मिळाल्यानंतरच कला मार्क वाढ प्रस्ताव मागवावे.

– सचिन साळुंखे
कलाध्यापक संघ, अमळनेर तालुकाध्यक्ष

गुणवाढीबाबतचे शासनाचे पत्र परस्पर शाळांना गेले असल्याने कला गुणवाढ किंवा गुणदान हे शाळास्तरावरील आहे. याबाबत मला काही सांगता येणार नाही. आपण याबाबत नाशिक बोर्डाला विचारणा करावी.

– रागिणी चव्हाण
उपशिक्षणाधिकारी जि प जळगाव

कोविडमुळे रेखाकला परीक्षा खूप उशिरा झाल्या,त्यामुळे एका वर्षात मी दोन वेळा चित्रकला परीक्षा दिल्या त्याचे प्रमाणपत्र आज पावतो मिळालेले नसल्याने मी माझ्या शाळेतील कलाशिक्षक पालवे यांना कोणते हमीपत्र भरून देऊ हेच कळत नाही. एसएससीचा अभ्यास करायला मार्कवाढ प्रस्तावच्या घोळमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही.

-उन्नती पाटील, विद्यार्थीनी
श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळा , अमळनेर