पाचोरा : धावत्या रेल्वेतून पडल्याने अन्नू हरिलाल कोल (वय ३१, सतना, मध्यप्रदेश) या परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला. हि घटना पाचोरा-माहेजी रेल्वेस्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरवातीला अनोळखी म्हणून नोंद असलेल्या या तरुणाची मोबाईल क्रमांकावरुन ओळख पटली.
पाचोरा ते माहेजी रेल्वेस्थानक खंबा क्र.३८४/७ ते ९ दरम्यान गुरुवार, ११ जुलै रोजी डाऊन रेल्वे लाइनजवळ एक अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत पडून असल्याची माहिती लोकोपायलट डी. एस. बोढरे यांनी वॉकिटॉकीवरून उपस्टेशन प्रबंधक पाचोरा यांना दिली. उपस्टेशन प्रबंधक यांनी तत्काळ पाचोरा पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती कळवली. लागलीच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व शव ताब्यात घेऊन अॅम्बुलन्सद्वारा पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलविले.
अनोळखी मयत प्रवाशाजवळ पोलिसांना मोबाइल आढळून आला. या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता मयताचे नाव अन्नू हरिलाल कोल (वय- ३१, रा. सतना, मध्य प्रदेश) असे असल्याचे समोर आले. तो मनमाड ते सतना प्रवास करीत होता. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. विकास खैरे हे करीत आहेत.