तरुण भारत लाईव्ह ।८ जानेवारी २०२३। धरणगाव : भुसावळ बांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेसच्या प्रचंड प्रतिसादामुळे खान्देशातील प्रवाशांची खान्देश एक्स्प्रेस दररोज करण्याची मागणी उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधीकडे होती. परंतु मध्य रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे या गाडीस ट्रॅक उपलब्ध होत नव्हता. परंतु मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व रेल्वे बोर्ड दिल्ली संयुक्त बैठकीत आ.जयकुमार रावल, खा.उन्मेश पाटील, खा.सुभाष भामरे व खा. हीना गावीत यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे आग्रह धरुन पाठपुरावा केल्याने दिल्ली रेल्वे बोर्डाने मागणीस नुकतीच संमती देत मुंबई सेंट्रल ते भुसावळ 09051 व भुसावळ ते मुंबई सेंट्रल 09052 ही गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.
पश्चिम खान्देशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नवीन हंगामी प्रवाशी रेल्वे 9 जानेवारीपासून 31 मार्चपावेतो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. ही गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री 11.55 मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल. प्रवासादरम्यान बोरीवली, बोेईसर, वापी, बलसाड, नवसारी, चलथान, भेस्तान, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार या ठिकाणी थांबून सकाळी 9 वा. दोंडाईचा 9.28, शिंदखेडा 9.43, नरडाणा 10 वा., अमळनेर 10.47 , धरणगांव 11.10, पाळधी 11.55, जळगाव व दुपारी 12 वा.भुसावळ येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात सोमवार, बुधवार व शनिवारी सायं 5.40 वा. भुसावळ येथुन सुटेल. 6.25 जळगांव, 6.45 पाळधी, 6.58 धरणगांव, 7.18 अमळनेर, 7.44 नरडाणा, 8 वा. शिंदखेडा तसेच रात्री 8.18 दोडांईचा येथून सुटेल.
या गाडीला मागणी असलेल्या बोईसर, वापी येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे महेंद्र कोठारी, डी.आर.यु.सी.सी. मेंबर प्रतीक जैन, धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समिती सदस्य किरण वाणी आदींनी केले आहे.