पोलीस कर्मचार्‍यासह मित्राला बेदम मारहाण

जळगाव : पोलीस कर्मचारी मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवण करायला गेले. काही तरुणांनी त्यांच्या मित्रासोबत वाद घातला आणि त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल करण्यात आला. त्यात एकाला अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रानुसार, जामनेर तालुक्यातील मिर्झा मोहम्मद इसराल हिमायू बेग (वय-38) हे सोयगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार म्हणून नोकरीस आहे. सोमवारी 9 जानेवारी मिर्झा बेग हे त्यांचे मित्र सलीम शेख रा. जामनेर यांच्यासोबत दुचाकीने जळगावला प्लॉट बघण्यासाठी आले होते. प्लॉट बघितल्यानंतर दोघ दुचाकीने जामनेर येथे जाण्यासाठी निघाले. जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील रॉकेश हॉटेल येथे सायंकाळी 5.30 वाजता जेवण करण्यासाठी थांबले.

दरम्यान, मिर्झा मोहम्मद हिमायू बेग हे लघू शंका करण्यासाठी गेले असता, त्याचवेळी टेबलावर जेवण करीत असलेल्या त्यांच्या मित्राला त्याठिकाणी बसलेल्या तिघांकडून हुज्जत घालीत होते. भांडण सोडविण्यासाठी मिर्झा बेग हे गेले असता त्यांना देखील मारहाण केली. पोलीसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे तिघांचे नावे निष्पन्न झाले.

याप्रकरणी संशयित आरोपी आकाश विश्वे रा. सुप्रिम कॉलनी, सुनिल सुभाष साळवे रा. पाळासखेडा ता. सोयगाव जि.औरंगाबाद आणि सुनिल सोनार (पुर्ण नाव माहिती नाही) या तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाला अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी सुनिल सुभाष साळवे याला मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, आनंदसिंग पाटील, किशोर पाटील, विकास सातदिवे यांनी ताब्यात घेतले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी व सिद्धेश्वर धापकर हे करीत आहे.