जळगाव : परराज्यातील व्यावसायिक तरुणाने हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसस्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूषण भिका वाघ (वय ३० रा. सुदामा नगर, भोपाल, मध्यप्रदेश) असे मयत तरूणाचे नाव आहे.
भोपाल येथील सुदामा नगरात भूषण वाघ हा तरूण आईवडील आणि लहान बहिण यांच्यासोबत राहत होता. त्याचा बांधकाम साहित्य पुरविण्याचा व्यवसाय होता. तो कामानिमित्ताने मागील आठ ते दहा दिवसांपासून जळगावात राहत होता. तो अजिंठा चौफुलीवरील एका हॉटेलच्या रूममध्ये राहत होता.
त्याने बुक केलेल्या रूममध्ये गुरूवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गळफास घेत जीवन यात्रा संपवली. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचललं हे कारण समोर आले नाही. हॉटेल मालक यांनी एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधुन घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा केला व वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.