---Advertisement---
भुसावळ : मनी लाँडरिंग व अतिरेक्यांकडून पैसे घेतल्याचे खोटे सांगत पोलीस अधिकारी बोलत असल्याचा बनाव केला. मुंबई कुलाबा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात तुमचे अटक वारंट निघाले आहे, असा दम भरत सायबर ठगांनी एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ८० लाख पाच हजार ४१६ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक मामला जिल्ह्यात समोर आला आहे.
८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे भुसावळ येथे महावितरण विभागातून अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. २८ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर २०२५ या दरम्यान त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संशयित सायबर ठगाने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन संपर्क साधला. पोलीस अधिकारी बोलत असल्याचा त्याने निवृत्त अधिकाऱ्याला भासविले. मुंबई कुलाबा पोलीस ठाण्यात मनी लॉडरिंग तसेच अतिरेक्यांकडून तुम्ही पैसे घेतल्याचा दम भरला. याप्रकरणी तुमच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे, अशी खोटी माहिती त्याने खरी असल्याचे भासविले.
हा गुन्हा खरा आहे, हे निवृत्त अधिकाऱ्याच्या मनावर बिंबविण्यासाठी सायबर ठगाने या खोट्या गुन्ह्याचे फेक कागदपत्र तसेच इतर बोगस आरोपींचे फोटो त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठविले. या गुन्ह्यात तुमचा सहभाग आहे, असे सांगत या गुन्ह्यात तुमचे अटक वारंट निघाले असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर त्यांना वारंवार धमकावित घाबरविले. मात्र या प्रकरणात वाचवू शकतो, असा नकली विश्वास देत वेळोवेळी ऑनलाईन एकूण ८० लाख पाच हजार ४१६ रुपये इतकी रक्कम आरटीजीएसद्वारे त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यात स्वीकारत गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर निवृत्त अधिकाऱ्याने जळगाव येथे सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत कैफियत मांडली. याप्रकरणी तक्रारीनुसार गुरुवारी (११ डिसेंबर) गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे तपास करीत आहेत.









