---Advertisement---
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी झालेल्या मविआच्या नेत्यांच्या बैठकीत जागा वाटपावरून वादंग झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वॉक आऊट केला, तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने स्वबळाचा नारा दिला आहे.
मविआच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ३२ जागांची मागणी केली, त्यावर उद्धव ठाकरे यांच्या सेनेने १० ते १५ जागा देण्याची तयारी दर्शवली. त्यात उद्धव सेना व शरद पवार गटाच्या काही उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली.
जागा वाटपाच्या मुद्द्यापेक्षा या बैठकीत ज्या प्रभागांवर उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून दावा करण्यात आला, त्याच प्रभागांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही दावा करण्यात आला. मात्र, दोन्हीही पक्षांकडून त्या जागांबाबत शेवटपर्यंत तडजोड होऊ शकली नाही.
उद्धव सेनेकडून या बैठकीत गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही नगरसेवक नसल्याचे सांगण्यात आले. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव सेनेची शहरात ताकद काय…? असा सवाल करण्यात आला.
अन् शरद पवार गटाचे वॉक आऊट
या बैठकीत मनपाच्या जागा वाटपावर प्रामुख्याने चर्चा झाली. दोन्ही पक्षांनी आपापल्या मागण्या मांडल्या. मात्र, दीड तासांच्या चर्चेनंतरही जागा वाटपावर कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही.
चर्चा सुरू असताना जागांच्या विषयावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ही बैठक मध्येच सोडून दिली. त्यामुळे महाविकास आघाडी फिस्कटली आहे.









