---Advertisement---
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून राज्यातील २९ महापालिकांमध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजप सत्तास्थापन करण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. या निवडणुकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची कामगिरीही एकूण समाधानकारक म्हणावी अशी आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाणे हे पारंपरिक बालेकिल्ले शिंदे गटाने कायम राखले. मात्र मुंबई महापालिकेत अपेक्षित यश न मिळाल्याचं चित्र दिसलं. तरीही २९ जागा जिंकत मुंबईतील राजकारणात संघटना मजबूत करण्याची संधी शिवसेनेला मिळाली आहे.
महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांचे वेध लागले असून, या निवडणुकांमध्ये महायुतीचा फॉर्म्युला सर्वत्र एकसारखा राहीलच असं नाही, अशी चिन्हं दिसू लागली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढतील, तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. युतीच्या भूमिकेवरून थेट शिवसेनेतील नेत्यांमध्येच गट पडल्याचं चित्र समोर येत आहे. धाराशिव येथे आमदार तानाजी सावंत यांनी बोलावलेल्या बैठकीकडे शिवसेनेचे निरीक्षक राजन साळवी आणि पालकमंत्र्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे.
एकीकडे मुंबईत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजप–शिवसेना युती म्हणूनच जिल्हा परिषद निवडणूक लढवली जाईल, असं स्पष्ट केलं आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यात प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी दिसत आहे. तानाजी सावंत हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याची ठोस माहिती समोर येत आहे.
या घडामोडींमुळे युतीबाबत संभ्रम निर्माण झाला असून, मुंबईत घेतले जाणारे निर्णय आणि जिल्हा पातळीवरील राजकीय हालचाली यामध्ये मोठी तफावत असल्याचं जाणवत आहे. त्यामुळे भाजप–शिवसेना युतीचा दावा प्रत्यक्षात कागदापुरताच मर्यादित आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत आणि भाजपाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यातील संघर्षामुळे युती टिकणार की तुटणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवरील या अंतर्गत कुरबुरींचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.









