---Advertisement---
जळगावसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून शुक्रवार, १६ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरक्षित पार पडावी, यासाठी राज्य शासनाने नागरिकांसाठी विशेष नियम जाहीर केले आहेत.
या पार्श्वभूमीवर मंगळवार, १३ जानेवारीपासून शुक्रवार, १६ जानेवारीपर्यंत चार दिवसांचा ड्राय डे लागू करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद राहतील. तसेच या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास सक्त मनाई करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक असून मंगळवारी (ता. १३) सायंकाळी ६ वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. ड्राय डेचा हा निर्णय मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांमध्ये लागू राहणार आहे.
निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता व अनुशासन राखणे हेच शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, मद्यपानावरील बंदीमुळे मतदारांना सुरक्षित वातावरण मिळेल तसेच निवडणूक काळातील गैरप्रकार व संभाव्य अनुचित घटना टाळता येतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांना याबाबतची माहिती आधीच देण्यात आली आहे.
दरम्यान, निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पोलीस व प्रशासनाचा बंदोबस्त वाढवण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.









