तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : करार संपल्यानंतरही त्या जागेवर असलेल्या भंगार बाजार लवकरच महानगरपालिका खाली करणार आहे. दोन वर्षांपूर्वीच या जागेवरील दुकानदारांना करून दिलेला करार महासभेत रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या जागेचे मालकी हक्क आता मनपाकडे असून हा भंगार बाजार केव्हाही मनपा हटवून ती जागा खाली करण्याचे संकेत आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिले आहे. व्यायसायिकांनी आपल्याकडील कागदपत्रे सादर करावीत, अशा सूचना यापूर्वीच त्यांनी व्यायसायिकांना दिल्या होत्या. त्यावर नगरसवेक इब्राहिम पटेल यांच्या नेतृत्वात व्यावसायिकांनी सोमवारी १३ रोजी सायंकाळी आयुक्तांची भेट घेतली.
अजिंठा चौकात महापालिका मालकीची जागा भंगार बाजाराला देण्यात आली होती. या जागेची मुदत २०१८ मध्येच संपलेली आहे. ही जागा ताब्यात घेण्याबाबत फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या महासभेतदेखील ठराव करण्यात आला होता. त्यानंतर व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या असून त्यावर सुनावण्या झाल्या आहेत. हा भंगार बाजार हटविला तर सर्व व्यावसायिक उघड्यावर येतील, कुटूंबाच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण होईल, तो हटवू नये अशी विनंती या शिष्टमंडळाने केली. ही जागा महापालिकेने ९९ वर्षाच्या कराराने भाडे तत्वावर देण्यात आली होती, असे व्यावसायिकांनी सांगितले असले तरी ती प्रक्रियाच मुळात नियमबाह्य झालेली होती, त्यामुळे हा बाजार उठविलाच जाईल,असे आयुक्तांनी सांगितले. गेल्या चार वर्षापासून कारवाईत चालढकल केली जात असल्याने आता कोणत्याही क्षणी तेथे जेसीबी नेऊन कारवाई केली जाणार आहे.
याठिकाणी एकूण ११७ दुकानदारांनी सद्यस्थितीत असलेली ९० हजार स्केअर फूट जागेवर अतिक्रमण केले आहे. काही दिवसांपूर्वीच या जागेबाहेर अतिक्रमण करून रहदारीला त्रासदायक ठरणारे अतिक्रमण महापालिकेने काढले होते. पण मूळ अतिक्रमणाकडे महापालिकेचे दुर्लक्षच होते. या अतिक्रमित दुकानांना लक्ष करत त्याचवेळी कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
यापूर्वीच महापालिकेने या दुकानदारांना ८१ ब नुसार नोटीस देऊन त्यांना आपले साहित्य ठराविक मुदतीत येथून हलविण्यासही सांगितले होते. मात्र यावर ठोस निर्णय झाला नसून या सर्व गोष्टी कागदावरच सुरु आहे. यामुळेच अतिक्रमित दुकानदारांना चार वर्षांपासून ही जागा फुकट वापरात मिळत आहे. तर राजकीय दबाव आणि कर्मचार्यांमध्ये असलेला आळस यास कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
वाढते अतिक्रमण
एकीकडे शहरात जागोजागी अतिक्रमणाचा भस्मासुर जळगावला गिळंकृत करत असतांनाच महानगरपालिकेच्या अनेक जागांचा अशा प्रकारे फुकट उपभोग घेतला जात आहे. शहरात भर रस्त्यांवर हातगाड्या, फळ दुकाने, भाजीवाले व इतर लहान व्यावसायिक बिनधास्तपणे अतिक्रमण वाढविताना दिसतात. यावर अनेक दुकानदारांना अधिकृतपणे दुकाने देऊन मनपाला महसूल मिळू शकतो.