---Advertisement---
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाला अत्याधुनिक हाय स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन मनमाड येथे प्राप्त झाली आहे. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही अत्याधुनिक हाय स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन मनमाड स्थानकावरील डबल एक्झिट लाईनवर तैनात करण्यात येणार आहे. कार्यान्वित होणारी ही अत्याधुनिक अत्याधुनिक हाय स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन जीवनरक्षक व बचाव कार्यासाठी आवश्यक अशा आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.
यामध्ये पूर्णपणे कार्यक्षम ऑपरेशन थिएटर, हायड्रॉलिक रेस्क्यू डिव्हाइसेस, हायड्रॉलिक रेस्क्यू इक्विपमेंट, उच्च क्षमतेची प्रकाश व्यवस्था, प्लाझ्मा कटिंग उपकरणे तसेच एक्सोथर्मिक कटिंग साधने यांचा समावेश आहे. या विशेष सुविधांमुळे कोणत्याही रेल्वे अपघाताच्या प्रसंगी तातडीने, अचूक व प्रभावी बचाव आणि मदत कार्य करणे शक्य होणार आहे.
१४ जुलै २०२७ ते २५ सप्टेंबर २०२७ दरम्यान नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या पवित्र सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे भुसावळ विभागाने अपेक्षित प्रचंड प्रवासी गर्दी हाताळण्यासाठी व्यापक व लक्ष केंद्रीत सुरक्षा सज्जता उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यात अत्याधुनिक हाय स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन असून, ती पूर्ण कार्यान्वित झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद, प्रभावी घटना व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची उच्च पातळी सुनिश्चित करेल. लाखो भाविक रेल्वेमार्गे प्रवास करणार असल्याने, अत्याधुनिक हाय स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन मुळे अपघातस्थळी तातडीची वैद्यकीय मदत, अडथळ्यांचे जलद निर्मूलन आणि रेल्वे सेवा वेगाने पूर्ववत करणे शक्य होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.









