तरुण भारत लाईव्ह ।१० मार्च २०२३। परभणीतुन एका अपघाताची बातमी समोर येतेय. बैलगाडी आणि कारचा अपघात होऊन दोन बैलांचा मृत्यू झाला आहे तर या अपघातामध्ये बैलगाडीमधील पिता-पुत्र जखमी झाले आहेत. अपघातामध्ये जखमी बाप-लेकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, परभणीच्या पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथील भगवान रोहिदास मगर आणि त्यांचा मुलगा वैभव भगवान मगर हे आपल्या शेतामधून बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बैलगाडी मधून चारा घेऊन गावाकडे येत होते. पोखरणी पाथरी महामार्गावरून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका कारने त्यांच्या बैलगाडीला जोराची धडक दिली. त्यामुळे बैलगाडीचा एक बैल अपघात स्थळापासून १५ ते २० फूट दूर जाऊन पडला. अपघातामध्ये गंभीर दुखापत झाल्यामुळे या बैलाच्या जागीच मृत्यू झाला. तर गाडीला असलेल्या दुसऱ्या बैलाला अपघातामध्ये मार लागल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दुसऱ्या बैलाचा देखील मृत्यू झाला.
तसेच या अपघातात गाडीमध्ये असलेले बाप-लेक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.