तरुण भारत लाईव्ह ।१४ जानेवारी २०२३। नापतोल ऑनलाईन शॉपींग कंपनीकडून तुम्हाला मारुती स्विफ्ट डिझायर गाडी ‘लकी ड्रॉ’मध्ये लागल्याची बतावणी करून विविध चार्जेसच्या नावाखाली जळगावातील एकाची चार लाख 80 हजार 242 रुपयात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार्जेसच्या नावाखाली उकळली रक्कम
याप्रकरणी गीता राजेश तिलकपुरे (रा. नवीपेठ, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नितीनकुमार सिंग नाव सांगणार्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. नापतोल ऑनलाईन शॉपींग या कंपनीकडून मारुती स्विफ्ट डिझायर गाडी लकी ड्रॉमध्ये लागल्याचे कुपन तिलकपुरे यांना पोस्टाने त्यांच्या राहत्या पत्त्यावर आले होते. या कुपनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यात नमूद केले होते. त्या क्रमांकावर तिलकपुरे यांनी संपर्क साधला. समोरील बोलणार्याने आपले नाव नितीनकुमार सिंग असे त्यांना सांगितले.
आपण नापतोल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नितीनकुमार सिंगनामक व्यक्तीने तिलकपुरे यांना त्यांच्या व्हॉटसअॅप क्रमांकावर कंपनीचे बनावट नाव, लोगो, स्टँप असलेले मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचे बनावट पत्र असे एक ना अनेक कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन केला. आपल्याला चारचाकी गाडी मिळणार या आमिषाला भुलून तिलकपुरे यांनी विविध चार्जेसच्या नावाखाली ‘फोन पे’च्या माध्यमातून नितीनकुमार सिंग नामक व्यक्तीला वेळोवेळी एकूण चार लाख 80 हजार 242 रुपये पाठवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिलकपुरे यांनी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.