पाचोरा : शहरात एका व्यावसायिकाने दुकानात गळफास लावून जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. पाचोरा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.परभतसिंग केसरसिंग राजपुत (वय ५२, रा. पांडव नगरी, पाचोरा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
पाचोरा पोलिस स्थानकाच्या जवळच परभतसिंग यांचे गणेश झेरॉक्स नावाने दुकान आहे. ते झेरॉक्स व तहसिल, प्रांत कार्यालयास लागणारे अर्ज विक्री करुन आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. रविवार, ८ सप्टेंबररोजी सुट्टीचा दिवस असल्याने परभतसिंग राजपुत हे सकाळी ८ वाजता घरुन निघाले होते. दरम्यान, परभतसिंग राजपुत यांना रस्त्यात काही मित्रही भेटले. मित्रांसोबत गप्पा मारल्या नंतर ८:३० वाजेच्या सुमारास परभतसिंग राजपुत हे दुकान उघडुन दुकानात गेले.
दरम्यान काहीच वेळात ते दुकानात नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी परभतसिंग राजपुत यांना मृत घोषित केले.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. परभतसिंग यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांचे पश्चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.