ओव्हरटेक करण्याच्या नादात अंदाज चुकला, तरुणाने गमावला जीव; मित्र थोडक्यात बचावला

मुक्ताईनगर : शहरातील उड्डाणपुलावर कंटेनरला ओव्हरटेक करताना दुचाकीस्लिप झाल्याने दुचाकीस्वार थेट कंटेनरच्या खाली सापडला. या अपघातात दुचाकीस्वर जागीच ठार, तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरूण सुदैवाने बचावला. ही घटना मंगळवार, २५ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. अनिल छोटू डागोर (४०, रा. रामदेव बाबा नगर, मलकापूर, जि. बुलढाणा असे मयत दुचाकीस्वराचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, अनिल छोटू डागोर हा तरुण आपला मित्र अभिषेक टाक याच्यासोबत दुचाकीने मंगळवार, २५ जून रोजी दुपारी मलकापूरकडून भुसावळकडे जाण्यासाठी निघाले होते. मलकापूरहून जळगावकडे ट्रॅक्टर घेऊन जाणारा एक कंटेनर पुढे जात होता.

दरम्यान, मुक्ताईनगर शहरातील उड्डाणपुलावर दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार अनिल डागोर याने कंटेनरला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावर पडलेल्या पाण्यामुळे त्याची दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे तो कंटेनरच्या क्लीनर भागाच्या मागच्या चाकात आल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. तर मागे बसलेला अभिषेक टाक थोडक्यात बचावला.

ही घटना घडल्यानंतर महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिसांनी धाव घेतली व मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला . दरम्यान मयत हा मलकापूर येथील रेल्वे स्टेशनचे साफसफाईचा ठेका घेवून आपला उदरनिर्वाह करत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.