Beed Crime : वाल्मिक कराडचे व्हिडिओ का पाहतोस? असा जाब विचारत फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याला आता लातूर येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. केज तालुक्यातील करनळी गावातील हे प्रकरण असून अशोक मोहिते असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे.
अशोक मोहितेला मारहाण करणारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचे बोलले जात आहे. कृष्णा आंधळे याचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर त्याचा फोटो ठेवला होता. अशोक मोहिते वाल्मिक कराडचे व्हिडिओ पाहत असताना त्याच्या वर ही हिंसक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : Amalner News : मधमाशांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू
मारहाण करणाऱ्या व्यक्तींमध्ये वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांचा समावेश असल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराडचे व्हिडिओ का पाहतोस, असा सवाल करत अशोकला बेदम मारहाण करण्यात आली. अशोक हा धारुर पोलीस स्टेशनमध्ये होमगार्ड म्हणून नोकरी करत आहे. मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असून डोळ्यावर सूज आली आहे. तसेच, पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : सावधान! सायबर ठगांचा नवा फंडा, बँक बॅलेन्सवर असा घालतात गंडा
या घटनेनंतर अशोकच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली आहे. अशोकच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “तो कोणाला काही बोलला नव्हता. रात्रभर तो जागा होता आणि व्हिडिओ पाहत होता. त्यावेळी तू हे व्हिडिओ का पाहतोस, असे विचारून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले.”
गावचे सरपंच शिवाजी मोहिते यांनी सांगितले की, “आम्ही आधी अशोकला रुग्णालयात नेले. नंतर पोलीस स्टेशनला गेलो. मात्र, पोलीस फिर्याद घ्यायला तयार नव्हते. ते फक्त रिपोर्ट आल्यावरच पुढील कारवाई करणार असल्याचे सांगत होते. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.”