Diwali 2024: दिवाळी म्हटल की रोषणाई, दिव्यांचा लखलखाट, सजावट आणि फराळ हे सगळेच आले. मात्र याबरोबरच दिवाळीत अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व असते. यामुळे या दिवशी मन प्रसन्न करणारं सुगंधी उटणे लावून अंघोळ केली जाते. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अंगाला उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.
अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. नरकचतुर्दशीच्या दिवशीही पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केला जातो. दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे.
काय आहे आख्यायिका?
नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे.
अभ्यंगस्नानाचं महत्त्व
अभ्यंगस्नान हे दिवाळीतल्या चार दिवसांपैकी नरक चतुर्दशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाला आणि बलिप्रतिपदेला केलं जातं. हे स्नान शक्यतो ब्राम्ह मुहूर्तावर म्हणजेच सकाळी लवकर उठून साडेचार पासून ते सकाळी ६ .३ ० च्या दरम्यान केले जाते. या दरम्यानच्या कालावधीमध्ये वातावरणात वात हा जास्त प्रमाणात असतो. आपल्या शरीरात देखील वाताचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेस अभ्यंगस्नान केल्याने शरीराला जास्त फायदे होतात.
अभ्यंगस्नान पद्धत
शास्त्रानुसार, नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अंगाला मुलतानी माती लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंगस्नान म्हणतात. ज्यामध्ये हळद, चंदन, दही, बेसन, तिळाचे तेल, औषधी वनस्पती इत्यादी मिसळून पेस्ट तयार केली जाते, ज्याद्वारे संपूर्ण शरीराची मालिश केली जाते. अंगावर उटणे लावून अंघोळ केली जाते. या उटणामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास देखील मदत होते.
अभ्यंगस्नानाचे फायदे काय?
नरक चतुर्दशीच्या दिवशी पारंपारिक अभ्यंग स्नान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. दिवाळीत आंघोळ करण्यापूर्वी तिळाच्या तेलाने शरीराची मालिश केली जाते. दिवाळी हिवाळ्यात येते आणि तिळाच्या तेलाने मसाज केल्याने शरीर उबदार होते. यामुळे तुमच्या शरीरातील पित्ताची पातळीही कमी होते. यासोबतच चेहऱ्यावर आणि शरीरावर उटणे लावल्याने शरीराची त्वचा तजेलदार होते. चेहऱ्यावर तेज येते. यासोबतच मसाज केल्याने स्नायू बलवान होतात. उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडी पडत असलेली त्वचा देखील मऊ होते.