पाकिस्तानात बसलेल्या अबूला मानले गुरू, श्रीलंकेत घेतले प्रशिक्षण… काय होती ISIS च्या दहशतवाद्यांची योजना?

नवी दिल्ली : गुजरातमधील अहमदाबाद येथून 4 ISIS दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याने मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, अटक करण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांपैकी दोन जण श्रीलंकेतून 40 वेळा भारतात आले आहेत. एवढेच नाही तर त्यांनी भारतातील अनेक शहरांना भेटी दिल्या आहेत. मात्र, हे दहशतवादी कोणत्या शहरात पोहोचले आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले दहशतवादी मोहम्मद नुशरथ आणि मोहम्मद नफरन हे अनेकवेळा भारतात आले आहेत. या दोघांनी अनेक शहरांमध्ये रेकी केल्याचा संशय एजन्सीला आहे. या दहशतवाद्यांचे पाकिस्तान कनेक्शन आहे. भारताने इस्रायलला पाठिंबा दिल्याने हे दहशतवादी प्रचंड संतापले आहेत.

तपास यंत्रणेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, नुशरथ आणि नफरन हे दहशतवादी पूर्वी ड्रग्ज आणि सोन्याची तस्करी करायचे. नंतर दोघेही इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाले. भारतात सोन्याच्या तस्करीप्रकरणी दहशतवादी नुशरथलाही अटक करण्यात आली आहे. आयएसआयएसच्या या चार दहशतवाद्यांचे पाकिस्तानमध्ये बसलेल्या दहशतवादी अबूशी संबंध आहेत. हे सर्व दहशतवादी अबूच्या संपर्कात होते. दहशतवादी अबूनेच त्यांना भारतात आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे आदेश दिले होते.

श्रीलंकेत प्रशिक्षण घेतले
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चार दहशतवाद्यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात श्रीलंकेत आत्मघाती हल्ले करण्यासाठी संपूर्ण प्रशिक्षण घेतले होते. हमासविरुद्धच्या युद्धात भारताने इस्रायलला पाठिंबा दिल्यापासून हा गट अधिक सक्रिय झाला आहे. भारताच्या या पावलामुळे हे दहशतवादी प्रचंड संतापले आहेत. त्यामुळेच भारतात लवकरच मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची योजना या गटाने आखली होती. सर्व दहशतवाद्यांना पाकिस्तानात बसलेल्या इसिसच्या दहशतवादी अबूकडून सर्व आदेश मिळत होते. हे चार दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या अबूला आपला आमिर म्हणजेच गुरू मानतात आणि त्यांनी शपथही घेतली होती.

 

व्हिडिओत दहशतवाद्यांनी काय केले?
हा व्हिडिओ भारतात येण्यापूर्वी काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये हे दहशतवादी शपथ घेताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सर्व दहशतवादी हातात शस्त्रे घेऊन भारतात दहशतवादी हल्ले करण्याची शपथ घेत आहेत. सूत्रांचा दावा आहे की, या दहशतवाद्यांचे लक्ष्य भाजप आणि आरएसएसशी संबंधित काही मोठे नेते होते. श्रीलंका आणि पाकिस्तानमधील इसिसचे दहशतवादी भारतात हल्ले करण्याची योजना आखत होते. हे सर्व दहशतवादी कोलंबोहून चेन्नईत आले होते. यानंतर त्यांनी चेन्नईहून इंडिगोचे विमान घेतले आणि अहमदाबादला पोहोचले. हे सर्वजण प्रोटॉन ॲपद्वारे पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते.