---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर खतांचा पुरवठा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना चांगले यश आले आहे. ५ जुलैपर्यंत जिल्ह्यात युरियाचे ७१ टक्के वितरण झाले असून, जिल्ह्यात सध्या सर्व प्रकारच्या खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचा दावा जिल्हा परिषद कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ई-पॉस यंत्रांच्या माध्यमातून युरियाची पारदर्शक विक्री करण्यात आली. या कालावधीत एकूण उपलब्ध युरियापैकी ७१.४२ टक्के साठा वितरित झाला. १३ जूनला जिल्ह्यात ४२ हजार ९१० मेट्रिक टन युरियाचा साठा होता. ५ जुलैपर्यंत यापैकी ३० हजार मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून, आता १२ हजार ९८८ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. त्यापैकीही बराच साठा गेल्या काही दिवसांमध्ये विक्री झाला आहे. आता पेरणीदेखील ९० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने, युरियाची मागणी वाढणार आहे.
युरियाची चढ्या दराने विक्री
दुसरीकडे, शासनाने युरियाचे दर निश्चित केले असले तरी, अनेक ठिकाणी चढ्या दराने युरियाची विक्री सर्रास सुरू आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार अगदी बिनबोभाटपणे सुरु आहेत. त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. गरजेपोटी शेतकरी दुप्पट-तिप्पट पैसे मोजायला तयार होत असल्याने, काळा बाजाराला प्रोत्साहन मिळत आहे. कृषी विभागाचे यावर नियंत्रण नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.