accident : बीड-नगर मार्गावर भीषण अपघात; वडील-मुलासह पाच जणांचा मृत्यू

accident : छत्रपती संभाजीनगर : 

ट्रक व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात वडील-मुलासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास बीड-नगर मार्गावरील लिंबागणेश गावापासून काही अंतरावरील ससेवाडी शिवारात घडली.

या अपघातात प्रल्हाद सिताराम घरत (वय ६३), नितिन प्रल्हाद घरत (४१, दोघेही रा. महाजनवाडी ता. जि. बीड) या पिता-पुत्रासह विनोद लक्ष्मण सानप (४० रा. वाघिरा ता. पाटोदा) अशा तिघांसह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत अन्य दोघांची रात्री ११ पर्यंत ओळख पटली नव्हती.

ओळख न पटलेले ट्रकमधील असल्याचे समजते. अपघात एवढा भीषण होता की सर्व मृतांना बाहेर काढण्यासाठी एकमेकांमध्ये अडकलेल्या वाहनांचा पत्रा कापण्यासाठी यंत्र मागवावे लागले होते.

शवविच्छेदनासाठी बीडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचे काम रात्री १० पासून सुरू होते. घटनास्थळावर एक क्रेनही आणण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून नेकनूर पोलीस व स्थानिक नागरिकांचे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदतकार्य सुरू होते.