अमळनेर : बारावीच्या विद्यार्थ्यांचा धार येथील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. जयेश दीपक पाटील (वय १८) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयेश पाटील हा कंडारी गावाचा रहिवासी होता. तो मारवाड कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याने प्रताप महाविद्यालयातून अकरावी केल्यानंतर बारावीसाठी मारवडला महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. शिक्षणासाठी शहरातील अयोध्या नगरात खोली घेऊन राहत होता. जयेश हा दीपक भरत पाटील यांचा एकुलता एक मुलगा आहे. जयेशच्या पश्चात आई, वडील, एक बहीण आणि आजी, आजोबा आहेत.
जयेश आणि आणखी दोघे जण शुक्रवारी २९ रोजी दुपारी धार येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात असलेल्या मंदिरापर्यंत पोहण्याची स्पर्धा त्यांच्यात लागल्याचे समजते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो पाण्यात बुडाला. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मारवड पोलिसांच्या उपस्थितीत ठाण्याचे पोहेकाँ सुनील तेली, पोहेकाँ मुकेश साळुंखे यांच्यासह नागरिकांनी यांनी सदर तरुणाचा मृतदेह तलावातून काढला. रुग्णालयात नेला असता तेथे डॉक्टरांनी जयेशला मयत घोषित केले.