जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघाताची मालिका सुरु आहे. २८ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्कजवळ झालेल्या अपघातात एक तरुणी व महिला जागीच ठार झाली तर तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झाला. हा अपघात होऊन दोन दिवस उलटत नाही तोपर्यंत पुन्हा आज शनिवार, ३१ रोजी द्वारकानगराजवळ महामार्गावर सकाळी १० वाजेच्या सुमारास एकाचा अपघाती मृत्यू झाल्याने लोक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. रस्त्यावरील खड्यांमुळेच हा अपघात झाला असल्याचे सांगत संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले.
शनिवार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव कारने एका ७८ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली. यात वृद्धाच्या जागीच मृत्यू झाला असून संतप्त नागरिकांनी पूर्ण महामार्ग रास्ता रोको करून जाम केला. अजबसिंग नारायण पाटील (वय ७८, रा. द्वारका नगर, जळगाव, मूळ रहिवासी ता. यावल) असे मयत वृद्धाचे नाव आहे. ते द्वारका नगर येथे त्यांची मुलगी सुवर्णा मंगलसिंग पाटील यांच्याकडे राहत होते. तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील हा त्याच्या कुटुंबासह गावी यावल तालुक्यात येथे शेतीकाम करण्यासाठी राहत होता. अजबसींग पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
शनिवारी दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेनंतर ते द्वारका नगर स्टॉपजवळ झाडाखाली असणाऱ्या पारावर बसण्यासाठी गेले होते. रस्ता ओलांडत असताना जळगावकडून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळेला द्वारका नगरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. घटना आजूबाजूच्या पंचक्रोशीत समजताच सर्व बाजूने नागरिकांनी महामार्गावर येऊन रास्ता रोको सुरू केला.
शनिवार, ३१ रोजी पुन्हा अपघात झाल्याने माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी नागरसेव अमर जैन यांच्यासह नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. याप्रसंगी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी हायवेच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आमदार सुरेश भोळे, तहसीलदार यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. सुमारे दोन तास चालणाऱ्या आंदोलनामुळे महार्गावरील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे जळगाव व पाळधीकडे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, रस्त्यावरील खड्यांमुळेच अपघात होत असतानाही सुस्त जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास जाग येत नाही. त्यांना जाग येण्यासाठी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी खोटे नगर ते आकाशवाणी चौकापर्यंत पदयात्रा काढत ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला. दरम्यान, तीन दिवसात सर्व खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास महामार्ग खोदून वापरण्यास बंद करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.