---Advertisement---

अखेर ‘त्या’ अपघातप्रकरणी डंपरचालकासह मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

by team
---Advertisement---

जळगाव : वाळूची अवैध वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगाने रस्त्यांवरून ये-जा करीत आहेत. बुधवार, २५ रोजी सायंकाळी भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने योजस धीरज बहऱ्हाटे (रा. लीलापार्क अयोध्यानगर, वय १३) या मुलाचा मृत्यू झाला. कालिंका माता मंदिर चौफुलीजवळ ही घटना घडली. या प्रकरणी डंपर चालकासह मालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आठवडाभरातील ही तिसरी घटना या परिसरात घडली आहे.

या घटनेत योजस बहऱ्हाटे याच्या बहिणीसह मामाही जखमी झाले आहेत. या वेळी संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवित अवैध वाळू वाहतुकीविरोधात संताप व्यक्त केला. डंपर चालक शुभम भोलाणे (रा. वांजोळा, ता. भुसावळ) तसेच मालक आकाश बोरसे (रा. कांचननगर) या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला.
चालकाने डंपर आणताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. भरधाव वेगाने एखाद्याचा प्राण जाऊ शकतो, ही जाणीव असतानादेखील त्याने डंपर वेगाने आणले. तसेच दुचाकी क्रमांक (एम.एच. १९ बीवाय ३५९३) ला जाणीवपूर्वक मागून धडक दिली. या अपघातामध्ये योजस बहऱ्हाटे हा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला. योजस याचे मामा चेतन बेंडाळे यांनी डंपर चालकाकडे मदत मागितली असता चालक घटनास्थळावरून पळून गेला. यात स्वतः चेतन बेंडाळे, त्यांची भाची भक्ती (वय ११) हेही जखमी झाले आहेत.

विनानंबरच्या डंपरचा वाळू वाहतुकीसाठी वापर

वाळूची अवैध वाहतूक करताना रजिस्ट्रेशन क्रमांकावरून डंपरची ओळख पटू नये म्हणून डंपर मालकाने जाणीवपूर्वक क्रमांक टाकला नाही. चालक आणि डंपर मालक हे संगनमताने वाळूची अवैध वाहतूक करत असल्याचे वाहतूक व या तक्रारीत नमूद केले आहे. डंपर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.

नागरिकांचा संताप अनावर

वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव वाहनांच्या वर्दळीने जीव मुठीत घेऊन नागरिक महामार्गावरून वाटचाल करीत आहेत. वारंवार अपघाताच्या घटना घडत असतानादेखील प्रशासन रस्त्यावर या वाहनांना रोखत नाही किंवा अवैध वाळू उपसा थांबवित नाही, असा संताप नागरिकांमध्ये होता. आणि या संतापाची तीव्रता डंपर पेटविण्यातून दिसली. जमावाने प्रशासनालाही जुमानले नाही. प्रशासनाचे अवैध वाळू वाहतुकीसंदर्भात असलेल्या बोटचेप्या धोरणाने अवैध वाळू वाहतूक होत तर आहेच, मात्र ते कोणाच्याही जीवाची पर्वा न करता महामार्गावरून वाहने सुसाट नेताहेत, अशा भावना जमावाने व्यक्त केल्या. संयमी नागरिक रस्त्यावर उतरल्यानंतर जी परिस्थिती चिघळली, त्याला जबाबदार कोण? याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment